World Cup 2023 : पुण्याच्या मैदानावर चेसमास्टरचं शतक, बांगलादेशचा पराभव करत भारताचा विजयी चौकार
IND vs BAN, World Cup 2023 : चेसमास्टर विराट कोहलीने पुण्याच्या मैदानावर शतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला.
IND vs BAN, World Cup 2023 : चेसमास्टर विराट कोहलीने पुण्याच्या मैदानावर शतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. भारताने सात विकेट आणि 51 चेंडू राखून विजय मिळवला. बांगलादेशने दिलेले 257 धावांचे आव्हान भारताने 41.3 षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. विराट कोहलीने शतकी खेळी केली. तर शुभमन गिल याने अर्धशतक ठोकले.
विराट कोहलीचा शतकी धमाका -
पुण्याच्या मैदानावर विराट कोहलीने षटकार मारुन शतक केले. विराट कोहलीने 97 चेंडूमध्ये 103 धावांची नाबाद शतकी खेळी केली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्यासोबत त्याने महत्वाच्या भागिदारी केल्या. विराट कोहलीने 103 धावांमध्ये 4 षटकार आणि सहा चौकार मारले. केएल राहुल याने 34 धावा करत विराट कोहलीला चांगली साथ दिली.. रनमशीन विराट कोहलीचे यंदाच्या विश्वचषकातील पहिले शतक होय. त्याशिवाय त्याने दोन अर्धशतकेही ठोकली आहेत.
शुभमन गिलचे अर्धशतक -
एका बाजूला रोहित शर्माने रौद्ररुप धारण केले असताना दुसऱ्या बाजूला शुभमन गिल याने संयमी फलंदाजी केली. रोहित शर्मा तंबूत परतल्यानंतर गिल यानेही गिअर बदलला. शुभमन गिल याने 55 चेंडूमध्ये 53 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये शुभमन गिल याने पाच चौकार आणि दोन षटकार ठोकले. गिलने रोहितसोबत 88 धावांची भागिदारी केली. तर विराट कोहलीसोबत 42 धावांची भर घातली.
रोहित शर्माची वादळी सुरुवात -
कर्णधार रोहित शर्माने वादळी फलंदाजी करत बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली. रोहित शर्माने पहिल्या चेंडूपासून बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. रोहितने शुभमन गिल याच्यासोबत 88 धावांची सलामी दिली. रोहित शर्माने 40 चेंडूमध्ये 48 धावांची झंझावती खेळी केली. या खेळीमध्ये रोहित शर्माने दोन षटकार आणि सात चौकार ठोकले. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूमध्ये रोहित शर्माने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.
राहुल- श्रेयसची महत्वाचं योगदान -
केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी भारताच्या विजयात महत्वाचं योगदान दिले. श्रेयस अय्यर याने विराट कोहलीने चांगली साथ दिली. दोघांमध्ये 46 धावांची भागिदारी झाली होती. श्रेयस अय्यरने दोन चौकारांच्या मदतीने 19 धावांचे योगदान दिले. तर केएल राहुल याने 1 षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 34 धावांची खेळी केली. राहुलने विराट कोहलीला चांगली साथ दिली. दोघांमध्ये 75 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली.
बांगलादेशच्या एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. मेहदी मिराजने दोन विकेट घेतल्या. पण महागडी गोलंदाजी केली.