(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ind vs Ban Day-1 : कानपूरमध्ये पावसाचा लपंडाव! पहिल्या दिवशी 35 षटकांचा खेळ; अश्विनने मोडला मोठा विक्रम; जाणून घ्या काय झाले
भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्याची कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे.
Ind vs Ban Day-1 has been called off in Kanpur : भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्याची कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. पण सामन्याच्या पहिल्या दिवशी कानपूरमध्ये पावसाचा लपंडाव पाहिला मिळाला. त्यामुळे पहिल्या दिवशी फक्त 35 षटकांचा खेळ खेळल्या गेला. आधी खराब प्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला, त्यानंतर पाऊस आला.
दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ संपल्याचे घोषित करण्यात आले. पहिल्या दिवशी केवळ 35 षटके खेळली जाऊ शकली, ज्यामध्ये बांगलादेशने 3 विकेट गमावून 107 धावा केल्या. सध्या मोमिनुल हक 40 धावांसह खेळत आहे आणि त्याच्यासोबत मुशफिकुर रहीम 6 धावांसह खेळत आहे.
कानपूर कसोटीत बांगलादेशची सुरुवात खूपच खराब झाली, झाकीर हसन 24 चेंडू खेळला पण त्याला एकही रन करता आला नाही. आकाशदीपच्या चेंडूवर त्याने यशस्वी जैस्वालकडे सोपा झेल दिला. त्यानंतर काही वेळातच आकाशदीपने शादमान इस्लामला एलबीडब्ल्यू आऊट केले, इस्लामने 24 धावा केल्या. भारतीय कर्णधार रोहित शर्माने आठव्या षटकातच फिरकीपटूला आणले. रविचंद्रन अश्विनने ब-याच प्रयत्नांनंतर कर्णधार नझमुल शांतोची विकेट मिळवली, त्याने 31 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
अश्विनने मोडला अनिल कुंबळेचा विक्रम
रविचंद्रन अश्विन मात्र कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत अनिल कुंबळेपेक्षा खूप मागे आहे. पण आता अश्विन हा आशियाई खेळपट्ट्यांवर सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. अश्विनने कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी बांगलादेशचा कर्णधार नझमुल शांतोला आऊट केले, ही त्याची आशियातील 420 वी विकेट होती. त्याच्या आधी अनिल कुंबळेने आशियामध्ये एकूण 419 विकेट घेतल्या होत्या.
आता आशियामध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अश्विन केवळ मुथय्या मुरलीधरनच्या मागे आहे, ज्याने आशियामध्ये 612 विकेट घेतल्या होत्या. श्रीलंकेचा रंगना हेराथ 354 विकेट्ससह चौथ्या स्थानावर आहे.
हे ही वाचा -