IND vs BAN 2nd Test 2024 : कानपूर कसोटीवर संकटाचे काळे ढग... सामना रद्द झाला तर टीम इंडिला बसणार दणका, WTC पॉइंट टेबलमध्ये येणार खाली?
IND vs BAN 2nd Test 2024 Kanpur Weather Rain Forecast : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना ग्रीन पार्क स्टेडियम कानपूर येथे होणार आहे.
IND vs BAN 2nd Test 2024 Kanpur Weather Rain Forecast : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना ग्रीन पार्क स्टेडियम कानपूर येथे होणार आहे. हा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे. मात्र हा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी इंद्रदेव वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहेत, ते म्हणजे कानपूर कसोटीच्या पहिल्या तीन दिवसांत पावसाची शक्यता आहे. कानपूर कसोटीत पाऊस खलनायक ठरला आणि भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना रद्द किंवा अनिर्णित राहिला, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टेबलवर कोणत्या संघाला मोठे नुकसान सहन करावे लागेल?
कानपूर कसोटीवर संकटाचे काळे ढग...
कानपूर कसोटी अनिर्णित राहिलेली तर सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याच्या टीम इंडियाच्या आशांनाही मोठा धक्का बसू शकतो. कानपूर कसोटी 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाईल. Accuweather च्या वृत्तानुसार, सामन्याचे पहिले तीन दिवस पावसाची शक्यता आहे. 27 सप्टेंबर रोजी पावसाची सर्वाधिक शक्यता 93% आहे. तर 28 आणि 29 सप्टेंबर रोजी 80 आणि 59 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कानपुक कसोटीचे पहिले तीन दिवस पावसामुळे वाया गेले, तर उरलेल्या दोन दिवसांत कसोटी सामन्याचा निकाल मिळणे कठीण आहे, त्यामुळे हा सामना अनिर्णित राहू शकतो. या परिस्थितीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलची स्थिती काय असेल?
WTC पॉइंट टेबलची स्थिती?
सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलनुसार, टीम इंडिया 71.67% गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे, बांगलादेश 39.29% गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 4 गुण दिले जातील. अशा स्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या खात्यात केवळ 68.18% गुण शिल्लक राहतील. कानपूर कसोटीतील खेळपट्टीच्या अहवालानुसार, टीम इंडियाच्या विजयाची शक्यता जास्त आहे, जर भारताने दुसरी कसोटी जिंकली तर त्यांच्या खात्यात 74.24% गुण होतील.
टीम इंडियाला अजून किती कसोटी सामने खेळायचे आहेत?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्यासाठी टीम इंडियाला 9 कसोटी सामने खेळावे लागतील. त्यापैकी संघाला 5 जिंकावे लागतील. कानपूर कसोटीनंतर टीम इंडियाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध 3 कसोटी सामने खेळायचे आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना पावसामुळे वाहून गेला तर टीम इंडियाच्या अडचणी वाढणार आहेत.
कानपूरमध्ये टीम इंडिया कधी खेळली शेवटची कसोटी?
भारतीय संघाने आपला शेवटचा सामना ग्रीन पार्क येथे नोव्हेंबर 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता, जो एक कसोटी सामना होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपूर कसोटी अनिर्णित राहिली होती. आता बांगलादेशविरुद्ध कानपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटीत टीम इंडियाचा निकाल काय लागतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
280 धावांनी जिंकली चेन्नई कसोटी
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळला गेला होता. चेन्नई येथे झालेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पाहुण्या बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला. चेन्नई कसोटी चौथ्या दिवशीच संपली.