IND vs BAN 2nd Test : चुरशीच्या सामन्यात अखेर भारत विजयी, 3 विकेट्सनी बांगलादेला दिली मात, मालिकेतही क्लिन स्वीप
IND vs BAN : बांगलादेशच्या ढाका येथील शेर ए बांग्ला मैदानात पार पडलेला कसोटी सामना अतिशय रोमांचक झाला, एका लो स्कोरिंग कसोटीत अखेर भारताने विजय मिळवला आहे.
IND vs BAN, 2nd Test: भारत विरुद्ध बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs BAN 2nd Test) चौथ्या दिवशी भारताने तीन गडी राखून विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे सामना अगदी अखेरपर्यंत कोणाच्या पारड्यात झुकेल हे कळत नव्हते. सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत 227 धावाच केल्या, ज्याच्या बदल्यात भारतानं 314 धावा आपल्या पहिल्या डावात स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव 231 धावांवर आटोपला आणि भारताला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले, जे पार करता करता भारताचे 7 गडी बाद झाले पण अखेर अय्यर आणि अश्विन जोडीने संयमी खेळ दाखवत 3 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारतानं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशला क्लिन स्वीप दिला आहे. सामन्यात दोन्ही डावात मिळून 6 विकेट्स आणि दुसऱ्या डावात महत्त्वपूर्ण नाबाद 42 धावा करणाऱ्या अश्विनला सामनावीर म्हणून तर मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या पुजाराला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं.
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी करत बांगलादेशच्या फलंदाजांना 227 धावांत सर्वबाद केलं. बांगलादेशचा संघ 73.5 षटकंच खेळू शकला. यावेळी बांगलादेशसाछी मोमीनल हक याने 84 धावांची एकहाती झुंज दिल्यामुळे बांगलादेश 200 पार धावसंख्या पोहचवू शकला. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. यामध्ये उमेश यादवने 4 तर जयदेव उनाडकटने 2 विकेट्स घेतल्या. तर रवीचंद्रन अश्विन यानेही 4 विकेट्स घेतल्या.
भारताचा पहिला डाव
भारतीय संघाच्या पहिल्या डावाची सुरुवात तशी खास झाली नाही. सलामीवीर केएल राहुल 10 तर शुभमन गिल 20 धावा करुन तंबूत परतले. कोहली आणि पुजारा कमाल करतील असे वाटत होते पण दोघेही प्रत्येकी 24 धावा करुन बाद झाले. ज्यानंतर मात्र ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरनं डाव सावरला. दोघांनी दमदार अशी फलंदाजी सुरु ठेवली. पंतने त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये फटकेबाजी केली. दोघांनी 150 हून अधिक धावांची भागिदारी केली. पण शतकापासून दोघेही थोडक्यात हुकले. पंत 105 चेंडूत 93 धावा करुन बाद झाला तर श्रेयस अय्यर 105 चेंडूत 87 धावा करुन तंबूत परतला. ज्यानंतर इतर खेळाडू स्वस्तात बाद झाले आणि 314 धावांवर भारताचा डाव आटोपला. बांगलादेशकडून तायजून इस्लाम आणि कर्णधार शाकिबने प्रत्येकी 4 तर तास्किन अहमद आणि मेहदी हसननं प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारताला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य
भारतीय संघ सर्वबाद होताच बांगलादेशचा संघ दुसरा डाव खेळण्यासाठी मैदानात आला. पण या डावातही भारतानं कमाल गोलंदाजी करत बांगलादेशच्या संघाला 231 धावांवर रोखलं. बांगलादेशकडून लिटन दास (73) आणि झाकीर हसन (51) यांनी शानदार अर्धशतके झळकावली. ज्यामुळे बांगलादेशने 231 धावा करत भारतासमोर 145 धावांच लक्ष्य कसोटी विजयासाठी ठेवलं. भारताकडून या डावात अक्षरने सर्वाधिक तीन, अश्विन-सिराजने प्रत्येकी दोन तर उनाडकट आणि उमेशने प्रत्येकी एक विकेट घेतली.
अश्विन-अय्यरची संयमी फलंदाजी
विजयासाठी 145 धावांची गरज भारताला होती. पण सामन्यातील अखेरचा डाव त्यात गोलंदाजांसाठी फायदेशीर असणाऱ्या खेळपट्टीवर हे लक्ष्यही अवघड असणार असंच वाटत होतं. तसंच काहीसं सामन्यात झालं. भारताला 145 धावा करण्यासाठीही 47 षटकं आणि 7 गडी गमवावे लागले. गिल, राहुल, पुजारा, कोहली दुहेरी आकडा न गाठता बाद झाले. अक्षरनं 34 तर उनाडकटनं 13 धावा केल्या. पण हे दोघे बाद झाल्यावर पंत 9 धावा करुन स्वस्तात बाद झाला आणि भारताची चिंता वाढली. पण तेव्हात अश्विन आणि अय्यर जोडीने संयमी फलंदाजी करत भारताला विजयापर्यंत नेले, अश्विनने कमाल अशी 42 तर अय्यपने 29 धावांची नाबाद खेळी करत सात विकेट्सनी भारताला सामना जिंकवून दिला. विशेष म्हणजे मालिकेतील पहिला सामनाही भारतानं जिंकल्याने मालिका 2-0 अशा फरकाने भारताने जिंकत बांगलादेशला क्लिन स्वीप दिला आहे.
हे देखील वाचा-