IND vs AUS | ... तर रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार?
IND vs AUS : रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा हे दोन खेळाडू अद्याप भारतातच नॅशनल क्रिकेट अकॅडमीत आपल्या फिटनेसवर काम करत आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात या दोन्ही खेळाडूंची भूमिका महत्वपूर्ण असेल.
India Tour Of Australia | भारतीय क्रिकेट संघ दोन महिन्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. परंतु संघाचा स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि सर्वात अनुभवी गोलंदाज ईशांत शर्मा अजूनही बेंगळुरूतील नॅशनल क्रिकेट अकॅडमीतच आहेत. पुढच्या चार दिवसात रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा जर ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले नाहीत तर भारतीय संघासमोर अडचणी निर्माण होतील असे संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रीनी स्पष्ट केलं आहे.
रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा दोघेही बेंगळुरूतील एनसीएत आपल्या फिटनेस चाचणीला सामोरे जात आहेत. रोहित शर्मा दुखापतीमुळे 27 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या मर्यादित षटकांच्या सामन्यांत खेळू शकणार नाही. रवी शास्त्रींच्या मते कसोटी सामन्यात भाग घ्यायचा असेल तर या दोन्ही खेळाडूंनी लवकरात लवकर ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणे आवश्यक आहे. रवी शास्त्री म्हणाले की, "रोहित शर्मा एनसीएमध्ये काही चाचण्यामधून जात आहे. आता या चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच ठरेल की रोहित शर्माला आणखी किती काळ विश्रांती घ्यावी लागेल."
ऑस्ट्रेलियातील क्वॉरंटाईनसंबंधीचे नियम खूप कडक असल्याचे रवी शास्त्रींचे मत आहे. त्यामुळे या खेळाडूंनी लवकरात लवकर ऑस्ट्रेलियाला जायला हवं नाहीतर त्यांना कसोटी सामन्यांना मुकावं लागेल असेही त्यांनी सांगितले.
हे दोन्ही खेळाडूं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी सामन्यात खेळणार की नाही याबाततीत अद्यापही अस्पष्टता आहे. रवी शास्त्री म्हणाले की, "या दोन्ही खेळाडूंना कसोटी सामने खेळायचे असतील तर त्यांनी येत्या तीन चार दिवसांत ऑस्ट्रेलियासाठी रवाना व्हावे. अन्यथा अडचणी निर्माण होतील. आता हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी कधी रवाना होतील याची स्पष्ट माहिती नाही."
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ सुरुवातीला वनडे सामना खेळेल. त्यानंतर या दोन संघादरम्यान ट्वेंटी-ट्वेंटी सीरीज खेळण्यात येणार आहे. या दोन संघादरम्यान 17 डिसेंबरपासून चार कसोटी सामने खेळवण्यात येतील.
पहा व्हिडीओ: IND VS AUS | भारत-ऑस्ट्रेलिया वन डे, टी-20 सामन्यांना उत्तम प्रतिसाद, सामन्यांची 50% तिकीटं संपली
महत्वाच्या बातम्या: