IND vs AUS: दिल्ली कसोटी सामन्यात आर. अश्विन मोडू शकतो 'हा' मोठा विक्रम, अनिल कुंबळेलाही पछाडण्याची संधी
Ravichandran Ashwin : रविचंद्रन अश्विनने नागपूर कसोटी सामन्यात कसोटी फॉर्मेटमध्ये 450 विकेट्स पूर्ण केले असून आता त्याला दिल्ली कसोटी सामन्यादरम्यान आणखी काही महत्त्वाचे विक्रम मोडण्याची संधी आहे.
R Ashwin Records : भारतीय संघाने (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची शानदार सुरुवात करत नागपूर कसोटी सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकला. या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनची (Ravichandran Ashwin) गोलंदाजी अगदी अप्रतिम होती, ज्यात त्याने सामन्यातील दोन्ही डावात मिळून एकूण 8 विकेट्स घेतल्या. यासोबतच अश्विनने कसोटी फॉरमॅटमध्ये 450 बळींचा आकडाही पार केला. आता मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही तो काही नवे विक्रम मोडून आपल्या नावावर नोंदवू शकतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमीच रविचंद्रन अश्विनची उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते. त्यामुळे या कसोटी मालिकेत खेळण्याआधी कांगारू संघही त्यांच्याविरुद्ध जोरदार तयारी करताना दिसत होता. मात्र नागपूर कसोटी सामन्यात अश्विनने दमदार कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी पार पाडली. आता दिल्ली कसोटी सामन्यातही त्याच्याकडून अशाच कामगिरीची सर्वांना अपेक्षा असेल. दिल्ली कसोटी सामन्याबद्दल बोलायचं झालं तर रविचंद्रन अश्विन दोन मोठे विक्रम आपल्या नावावर करू शकतो. यामध्ये त्याने या कसोटी सामन्यात आणखी 3 विकेट्स घेतल्यास अनिल कुंबळेनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 100 बळी घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरेल.
याशिवाय अश्विनने आतापर्यंत भारतात 25 वेळा एका डावात 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे आणि या बाबतीत तो अनिल कुंबळेसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. दिल्ली कसोटी सामन्यादरम्यान त्याने एका डावात 5 विकेट्स घेतल्यास तो अनिल कुंबळेला मागे टाकून या बाबतीत पहिल्या स्थानावर पोहोचेल. दुसरीकडे, जर अश्विनने या सामन्यात 8 विकेट्स मिळविण्यात यश मिळवलं, तर तो माजी भारतीय कर्णधार कपिल देवच्या 687 आंतरराष्ट्रीय विकेट्सला मागे टाकून सर्व फॉरमॅटमध्ये भारतासाठी तिसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनेल. याशिवाय, अश्विनने दिल्ली कसोटी सामन्यात आणखी 6 विकेट्स घेतल्यास कपिल देवला मागे टाकून दिल्लीत सर्वाधिक कसोटी बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरेल.
चेतेश्वर पुजाराचा 100 वा कसोटी सामना
टीम इंडियाचा स्टार कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराही (Cheteshwar Pujara) या कसोटी सामन्यात मैदानात उतरताच त्याची नोंद रेकॉर्ड बुकमध्ये होईल. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हा 100 वा कसोटी सामना असेल आणि भारताकडून अशी कामगिरी करणारा तो 13वा खेळाडू ठरेल. दुसरीकडे, जर तो या कसोटी सामन्यात 100 धावा करण्यात यशस्वी ठरला, तर तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी फॉर्मेटमध्ये 2000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा चौथा भारतीय खेळाडू बनेल.
हे देखील वाचा-