IND Vs ENG 1st Test: भारतीय गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी, नकोसा रेकॉर्ड केला नावे
नदीमने 44 षटकांत जवळपास चारच्या इकॉनॉमी रेटसह 167 धावा दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या आहेत. सुंदरचा इकॉनॉमी रेटही 3.8 आहे आणि 26 षटके टाकल्यानंतर त्याला एकही विकेट मिळाली नाही.
IND Vs ENG 1st Test match : चेन्नईत सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी दोन दिवसांपासून सुरू आहे. भारतीय गोलंदाजांनी 180 टाकल्या मात्र इंग्लंडच्या संघाला ऑलआऊट करु शकले नाही. यासह भारतीय गोलंदाजांनी अतिशय निराशाजनक विक्रम आपल्या नावे नोंदविला आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात भारताने आतापर्यंत 19 नो बॉल टाकले आहेत, जे गेल्या 10 वर्षात एका डावात भारतीय गोलंदाजांकडून टाकलेले सर्वाधिक नो बॉल आहेत.
इतकेच नव्हे तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही संघाच्या गोलंदाजांनी टाकलेला हा दुसरे सर्वाधिक नो बॉल आहेत. 2010 मध्ये कोलंबो येथे झालेल्या तिसर्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी 16 नो बॉल टाकले होते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकण्याचा विक्रम श्रीलंका टीमच्या नावे आहे. 2014 मध्ये श्रीलंकेने चटगाट येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशच्या डावात सर्वाधिक 21 नो बॉल टाकले होते.
कुणी किती नो बॉल टाकले?
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीम यांनी प्रत्येकी सहा नो बॉल टाकले. ईशांत शर्माने पाच आणि रविचंद्रन अश्विनने दोन नो बॉल टाकले. 2010 मध्ये कोलंबो कसोटी सामन्यात इशांत शर्माने दोन्ही डावात चार-चार नो बॉल टाकले होते.
गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी
चेन्नई कसोटीत टॉस जिंकल्यानंतर इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडचा संघाचा कर्णधार जो रूटच्या दुहेरी शतकाच्या जोरावर इंग्लंडने 8 गडी गमावत 555 धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडची नजर आणखी मोठ्या धावसंख्येवर आहे, जेणेकरुन दुसर्या डावात मैदानावर फलंदाजीसाठी उतरण्याची गरज पडू नये.
दुसर्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी भरपूर धावा दिल्या. नदीमने 44 षटकांत जवळपास चारच्या इकॉनॉमी रेटसह 167 धावा दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या आहेत. सुंदरचा इकॉनॉमी रेटही 3.8 आहे आणि 26 षटके टाकल्यानंतर त्याला एकही विकेट मिळाली नाही. अश्विन, बुमराह आणि ईशांत यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करण्यात यश मिळवले.
संबंधित बातम्या