India vs Australia : तिसऱ्या कसोटीआधी ऑस्ट्रेलियाला जबरदस्त झटका, Pat Cummins बाहेर, 'या' खेळाडूकडे संघाचं नेतृत्त्व
India vs Australia : भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी ऑस्ट्रेलियन संघाला जबरदस्त धक्का बसला आहे. कर्णधार पॅट कमिन्स 1 मार्चपासून इंदूर इथे होणाऱ्या तिसऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे.
India vs Australia Third Test : भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी ऑस्ट्रेलियन संघाला जबरदस्त धक्का बसला आहे. कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) 1 मार्चपासून इंदूर इथे होणाऱ्या तिसऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. दुसरा सामना संपल्यानंतर पॅट कमिन्स त्याच्या मायदेशी म्हणजेच ऑस्ट्रेलिया परतला होता. आता तो तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी परतणार नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत माहिती दिली आहे.
स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपदाची धुरा
पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत इंदूर इथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथ कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या सलग दुसऱ्या कसोटी पराभवानंतर कमिन्स गेल्या आठवड्यात सिडनीला रवाना झाला होता. कमिन्सच्या आईची तब्येत ठीक नाही, त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाला परतल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.
कमिन्स काय म्हणाला?
दिल्ली कसोटी तीन दिवसांत आटोपली आणि त्यानंतर तब्बल नऊ दिवसांची विश्रांती होती. त्यामुळे अशा स्थितीत बुधवारपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी 29 वर्षीय कमिन्स भारतात परतेल, अशी अपेक्षा होती, मात्र ते शक्य झालं नाही. त्यामुळे आता अहमदाबाद इथे होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी कमिन्स भारतात परतणार की नाही हे पाहावे लागेल. कमिन्स म्हणाला, "मी सध्या भारतात न परतण्याचा निर्णय घेतला आहे. मला वाटतं की मी माझ्या कुटुंबासह इथे ठीक आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि सहकाऱ्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे."
तर दुसरी कसोटी संपल्यानंतर स्टीव्ह स्मिथ पत्नीसह काही दिवसांसाठी दुबईला गेला होता. तिथे असतानाच त्याला पुढील कसोटीसाठी कमिन्सच्या गैरहजेर राहणार असल्याच्या निर्णयाची माहिती मिळाली. 2021 मध्ये उपकर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर स्मिथने अॅडलेडमध्ये झालेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व केलं आहे.
2017 मधील दौऱ्यात स्मिथने कर्णधारपद भूषवलं होतं
स्टीव्ह स्मिथने 2014 ते 2018 दरम्यानच्या 34 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्त्व केलं होतं. ज्यामध्ये 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाचा भारत दौऱ्याचा देखील समावेश होता. त्या दौऱ्यात स्मिथने तीन शतके झळकावली होती. मात्र, यंदा मात्र त्याच्यासाठी ही मालिका निराशाजनक ठरली आहे. त्याने आतापर्यंत चार डावांत 23.66 च्या सरासरीने 71 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 2023 (उर्वरित सामने)
• तिसरी कसोटी - 1 ते 5 मार्च (इंदौर)
• चौथी कसोटी - 9 ते 13 मार्च (अहमदाबाद)
• पहिली वनडे - 17 मार्च (मुंबई)
• दुसरी एकदिवसीय - 19 मार्च (विशाखापट्टणम)
• तिसरी एकदिवसीय - 22 मार्च (चेन्नई)
संबंधित बातमी
Pat Cummins: सलग दुसऱ्या कसोटीत कांगारूंचा पराभव; तरी कर्णधार कमिन्स मायदेशी परतला, नेमकं कारण काय?