(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS 3rd Test : इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाची ताकद आणखी वाढणार, स्टार अष्टपैलूचं पुनरागमन निश्चित
Cameron Green: भारताविरुद्ध इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू युवा खेळाडू कॅमेरॉन ग्रीन पुनरागमन करण्याची दाट शक्यता असून त्याने सरावही सुरु केला आहे.
IND vs AUS 3rd Test : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत (India vs Australia) ऑस्ट्रेलियन संघ (Team Australia) खास कामगिरी करत नसून मालिकेत 2-0 ने पिछाडीवर आहे. टीम इंडियाने नागपूर आणि दिल्लीत पाहुण्या संघाचा दारुण पराभव केला. आता इंदूरच्या होळकर स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. दरम्यान या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियासाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. एकीकडे कांगारूंचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क पुनरागमन करणार असून अष्टपैलू कॅमेरून ग्रीनही तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणं जवळपास निश्चित झालं आहे. कॅमेरून ग्रीनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कॅमेरून ग्रीन नेटमध्ये कसून गोलंदाजी करताना दिसत आहे.
इंदूर कसोटीत कॅमेरून ग्रीनचे पुनरागमन!
पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये (IND vs AUS Test Series) कॅमेरून ग्रीन ऑस्ट्रेलियन संघाचा भाग नव्हता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यादरम्यान त्याला ही दुखापत झाली होती, त्यानंतर ग्रीनला त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया (Cameron Green Injury) करावी लागली. दुखापतीमुळे नागपुर आणि दिल्ली दोन्ही सामन्यांत ऑस्ट्रेलियाचा संघ ग्रीनशिवाय मैदानात उतरला. ज्यानंतर पाहुण्या संघाला दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. पण आता ग्रीन फिट झाल्याचं दिसून येत असून तो कसून सराव करत आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात तो नक्कीच मैदानात उतरु शकतो. मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ 4 कसोटी मालिकेत 2-0 ने पिछाडीवर आहे. अशा स्थितीत पाहुणा संघ इंदूर कसोटीत पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलियन संघात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनंतर कॅमेरून ग्रीनचे पुनरागमन खूप महत्त्वाचे मानले जात आहे.
ग्रीनचा सराव करतानाचा VIDEO-
Cameron Green limbering up for his Test return #INDvAUS pic.twitter.com/MsYHsL6HhI
— Andrew McGlashan (@andymcg_cricket) February 27, 2023
ग्रीनची कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी
कॅमेरून ग्रीनच्या (Cameron Green) कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत 18 कसोटीत 35.04 च्या सरासरीने 806 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये ग्रीनने 29.78 च्या सरासरीने 23 विकेट्स घेतल्या आहेत, यादरम्यान त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 27 धावांत 5 विकेट्स घेतल्या आहेत.
तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ
ऑस्ट्रेलियन संघ : स्टीव स्मिथ (कर्णधार), स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मॅथ्यू कुह्नमॅन.
हे देखील वाचा-
- IND vs AUS : ऑस्ट्रेलिया संघासाठी आनंदाची बातमी! इंदूर टेस्टमध्ये स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचं होणार पुनरागमन