Ind vs Aus 2nd Test : पिंक बॉल कसोटीत जडेजा अन् अश्विन कट्ट्यावर बसणार; टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने सांगितले कारण
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे.
India vs Australia 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. हा डे-नाईट कसोटी सामना पिंक बॉलने खेळवला जाईल. पहिला सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. ॲडलेड कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही बदल होणार आहेत. रोहित शर्माचे पुनरागमन झाले असून, त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित पुन्हा एकदा कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.
पर्थ कसोटीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन योग्य वेगवान गोलंदाज, एक वेगवान अष्टपैलू आणि एक फिरकी अष्टपैलूसह मैदानात उतरली होती. भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसले नाहीत. आता ॲडलेड पिंक बॉल कसोटीही अश्विन आणि जडेजाला कट्ट्यावर बसावे लागू शकते.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये कॉमेंट्री करताना दिसत आहे. ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीपूर्वी पुजाराने रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना गुलाबी चेंडूच्या कसोटीत स्थान का मिळणार नाही, हे स्पष्ट केले. पुजाराने सांगितले की, पर्थ कसोटीत टीम इंडियाने चांगली गोलंदाजी केली. फिरकीपटू म्हणून सुंदर हा एक चांगला पर्याय आहे.
पुजाराला ईएसपीएनक्रिकइन्फोवर विचारण्यात आले की, दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने त्याच गोलंदाजीसह जावे असे तुम्हाला वाटते का? त्याला उत्तर देताना तो म्हणाला, "या गोलंदाजांनी आपला पहिला सामना जिंकून दिला आहे. बुमराह खूप चांगला दिसत होता. आणि सिराज, हर्षितने त्याला साथ दिली. तुम्हाला हे मान्य करावेच लागेल की त्याने खूप चांगली गोलंदाजी केली."
पुजारा पुढे म्हणाला, "नितीश कुमारने थोडी थोडी गोलंदाजी केली, त्यामुळे मला वाटते की ते चार वेगवान गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरसोबत योग्य पर्याय आहेत. जेव्हा त्याने सुरुवात केली तेव्हा तो फारसा चांगला दिसत नव्हता, पण नंतर त्याने काही विकेट्स मिळवल्या. वॉशिंग्टन सारखा फिरकीपटू संघात असावा, कारण तो चांगली फलंदाजी करू शकतो. त्याचा संघात समावेश करण्यामागचे कारण म्हणजे तो फलंदाजी करू शकतो आणि मला वाटते की दुसऱ्या कसोटी सामन्यात हा महत्त्वाचा भाग असेल.
वॉशिंग्टनच्या फलंदाजीबाबत पुजारा पुढे म्हणाला की, "जर भारताने काही विकेट लवकर गमावल्या. जर खालच्या मधल्या फळीला योगदान देण्याची गरज असेल, तर वॉशिंग्टन हे काम करू शकेल."