R Jadeja : जाडेजाचं ऑस्ट्रेलियाविरुद्ध खास शतक, लवकरच मोडू शकतो अश्विनचा विक्रम
Team India Test : रवींद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 5 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी विकेट्सचं शतक पूर्ण केले आहे.
![R Jadeja : जाडेजाचं ऑस्ट्रेलियाविरुद्ध खास शतक, लवकरच मोडू शकतो अश्विनचा विक्रम IND vs AUS 1st Test Ravndra Jadeja complete 100 test wickets against australia may break r ashwin record R Jadeja : जाडेजाचं ऑस्ट्रेलियाविरुद्ध खास शतक, लवकरच मोडू शकतो अश्विनचा विक्रम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/09/9c514596ee98b29814c0803e64ce3ce61675949503221323_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs Australia, Nagpur Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs Aus) यांच्यातील नागपूर कसोटी सामन्याचा पहिला दिवस संपला आहे. भारत 77 धावांवर 1 बाद अशा स्थितीत 100 धावांनी पिछाडीवर आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने 177 धावांवर सर्व गडी गमावल्यावर भारत फलंदाजी करत आहे. दरम्यान भारताकडून सर्वोत्त गोलंदाजी करणाऱ्या रवींद्र जाडेजाने 5 विकेट्स घेत कसोटी सामन्यात विकेट्सचं शतक पूर्ण केलं आहे.
पहिल्या डावाचा विचार करता जाडेजाने सर्वोत्तम कामगिरी करत 22 ओव्हरमध्ये 47 रन देत एकूण पाच गडी बाद केले. यासोबतच रवींद्र जडेजाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय भूमीवर 50 बळी पूर्ण केले आहेत. या बाबतीत रवींद्र जाडेजाने ऑफस्पिनर रवी अश्विनला मागे टाकले आहे. त्याचबरोबर जाडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात एकूण 100 बळी पूर्ण केले आहेत. रवींद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात एकूण 104 विकेट्स घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
अनिल कुंबळेने सर्वाधिक विकेट्ससह अव्वल
भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर अनिल कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. अनिल कुंबळे 142 विकेट्ससह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग आहे. हरभजन सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात 129 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर कपिल देव या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत तर रवी अश्विन चौथ्या क्रमांकावर आहेत. कपिल देव आणि रवी अश्विन यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात अनुक्रमे 124 आणि 115 बळी घेतले आहेत. यासोबतच आता रवींद्र जडेजा 104 विकेट्ससह या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तो लवकरच इतर दिग्गजांना मागे टाकू शकतो.
पहिल्या दिवशीचा लेखाजोखा
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात भारताकडून अगदी सुरुवातीपासूनच चांगली गोलंदाजी सुरु होती. दोन्ही सलामवीरांना शमी आणि सिराजनं बाद केलं. पण त्यानंतर भारताच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचे 8 गडी काही वेळातच बाद झाले. यावेळी जाडेजाने पाच तर अश्विनने तीन विकेट घेतल्या. तर सिराज आणि शमीनं प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी अॅलेक्स कॅरी याने 37 तर लाबुशेननं 49 धावांची सर्वाधिक खेळी केली. 177 धावा ऑस्ट्रेलियाने केल्यावर फलंदाजीला आलेल्या भारताकडून कॅप्टन रोहित शर्माने सुरुवातीपासूनच तुफान फटकेबाजी सुरु केली. आल्याआल्या चौकार मारण्यास त्यानं सुरुवात केली. ज्यामुळे भारतानं दिवस संपताना 77 धावांपर्यंत मजल मारली. यावेळी राहुल सावध खेळी खेळत होता पण 20 धावांवर त्याला मर्फी यानं बाद केलं. दरम्यान रोहितनं 69 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या असून दुसऱ्या दिवशी हे दोघे भारतीय फलंदाजीची सुरुवात करतील.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)