ICC Under 19 World Cup : यश धुलची विराट कोहलीशी बरोबरी; आयपीएल लिलावात मोठी बोली लगणार?
भारताच्या ऑस्ट्रेलियावरच्या दणदणीत विजयाचा कर्णधार यश धुल (Yash Dhull) हा प्रमुख शिल्पकार ठरला.
ICC Under 19 World Cup : भारतानं ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी धुव्वा उडवून अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये सलग चौथ्यांदा आणि आजवर आठव्यांदा धडक मारली. या विश्वचषकाच्या शनिवारी होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा मुकाबला इंग्लंडशी होईल. भारताच्या ऑस्ट्रेलियावरच्या दणदणीत विजयाचा कर्णधार यश धुल (Yash Dhull) हा प्रमुख शिल्पकार ठरला. यश धुल फलंदाजीला आला तेव्हा भारतीय संघातील दोन खेळाडू बाद झाले होते. त्यानं कर्णधारास साजेशी खेळी करून वैयक्तिक शतक झळकावलं. यश धुलला उपकर्णधार शेख रशीदची (Shaik Rasheed) उत्तम साथ मिळाली.
अंडर-19 विश्वचषकात शतक झळकावणारा यश धुल हा भारताचा तिसरा कर्णधार आहे. याआधी विराट कोहली आणि उन्मुक्त चंद यांनी ही कामगिरी केली होती. 2008 अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक केले होते. तर उन्मुक्त चंदने 2012 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले होते. हे दोन्ही खेळाडूही यश धुलप्रमाणे दिल्लीचे आहेत. अंडर-19 विश्वचषकाच्या नॉक आउट फेरीत शतक झळकावणारा यश धुल हा पाचवा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी चेतेश्वर पुजारा (129), उन्मुक्त चंद (111), रवनीत रिकी (108) आणि यशस्वी जैस्वाल (105) यांनी ही कामगिरी केली आहे.
आयपीएल 2022 चा मेगा लिलाव या महिन्यात 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे. लिलावासाठी निवडलेल्या 590 खेळाडूंच्या यादीत यश धुलचाही समावेश आहे. धुलची बेस प्राइज 20 लाख रुपये आहे आणि त्याला अनकॅप्ड ऑलराउंडर कॅटेगरीमध्ये लिस्ट करण्यात आलं आहे. अंडर-19 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये उत्तम कामगिरी केल्यानं आता फ्रेंचाइजी टीम यश धुलचा आपल्या टीममध्ये समावेश करण्यासाठी उत्सुक असतील.
हे ही वाचा -
महाराष्ट्रात प्रथमच क्रिकेटचा नवा ट्रेंड, अवघ्या पाच खेळाडूंचा संघ, यष्टीरक्षकाच्या जागी नेट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha