IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत कर्णधार कोहलीची मोठी अपडेट
Hardik Pandya Update: अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) फिटनेसबाबत सातत्याने चर्चा होत आहेत. यावर आता विराट कोहलीने (Virat Kohli) वक्तव्य केले आहे.
T20 WC 2021, IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) फिटनेसबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) म्हणाला की, हार्दिक पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापासून पांड्याच्या फिटनेसबाबत सतत चर्चा सुरू होती, त्यावर कोहलीने पूर्णविराम दिला आहे.
कोहली काय म्हणाला?
पांड्या फिट असल्याचे सांगत विराट कोहलीने त्याच्या गोलंदाजीचा बचाव केला. कोहली म्हणाला, "हार्दिक पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त आहे. मी किंवा हार्दिक पांड्या संघाचा सहावा गोलंदाज होऊ शकतो, पण 6 गोलंदाजांसह विजयाची शाश्वती नाही." याशिवाय शार्दुल ठाकूरबद्दलही कोहलीने मोठी गोष्ट सांगितली. तो म्हणाला, "शार्दुल ठाकूर हा टीम इंडियाच्या नियोजनाचा एक भाग आहे आणि तो खूप महत्त्वाचा खेळाडू आहे." मात्र, त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याबाबत कर्णधाराने स्पष्टपणे काहीही सांगितले नाही.
पुढील सामन्यात संघ पुनरागमन करेल, कोहलीचा आत्मविश्वास
संघाचे खेळाडू कठीण परिस्थितीत चांगली कामगिरी करतात आणि न्यूझीलंडविरुद्ध चांगले पुनरागमन करून संघाला विजय मिळवून देतील, असा विश्वास विराट कोहलीने व्यक्त केला आहे. कोहली म्हणाला, "संघातील क्रिकेटपटूंना कसं पुनरागमन करायचं हे माहीत आहे. याआधीही भारतीय संघाने अशा परिस्थितीत चांगली कामगिरी केली आहे."
हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा
हा सामना भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. 2003 नंतर टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या आयसीसी स्पर्धेत विजय मिळवता आलेला नाही. अशा स्थितीत न्यूझीलंडला हरवणे संघासमोर कडवे आव्हान असेल. टी-20 विश्वचषकातही भारताला न्यूझीलंडकडून दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. याशिवाय पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. यानंतर भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग कठीण होत चालला आहे. अशा स्थितीत हा सामना जिंकणे संघासाठी आवश्यक आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड संघानेही टी-20 विश्वचषकातील पहिला सामना गमावला आहे, अशा स्थितीत त्यांच्यासाठीही विजय मिळवणे खूप महत्त्वाचे आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकून उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवायच्या आहेत. हा सामना खूपच रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.