ICC Ranking : एकदिवसीय क्रिकेटमधील सध्याच्या घडीला अव्वल असणाऱ्या खेळाडूंची यादी नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीने (ICC) जाहीर केली. यावेळी भारतीय खेळाडूंचा विचार करता सध्या वेस्ट इंडीजविरुद्ध कर्णधार असणाऱ्या शिखर धवनला (Shikhar Dhawan) चांगला फायदा झाला असून तो थेट 13 व्या स्थानावर पोहोचला आहे. तर श्रेयस अय्यरनेही लागोपाठ दोन अर्धशतकं झळकावत 54 वं स्थान मिळवलं आहे. याशिवाय आघाडीचे खेळाडू  विराट कोहली (Virat Kohli) कर्णधार रोहित शर्माची(Rohit Sharma) मात्र घसरण झाली आहे.


वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार शिखरने 97 धावांची तुफान खेळी केली. ज्यामुळे त्याला एकदिवसीय रँकिंगमध्ये चांगला फायदा झाला आहे. तो 692 गुणांसह 13 व्या स्थानी पोहोचला आहे. श्रेयस अय्यरनेही लागोपाठ दोन अर्धशतकं झळकावत 20 स्थानांची झेप घेत 515 गुणांसह 54 वं स्थान मिळवलं आहे. याशिवाय भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराजही टॉप 100 मध्ये दाखल झाला आहे.


कोहलीसह रोहितला क्रमवारीत फटका


भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा या दोघांना मागील काही काळापासून खास कामगिरी करता आलेली नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध दोघेही फ्लॉप ठरले. आता वेस्ट इंडीजविरुद्ध दोघेही विश्रांतीवर असून यामुळे त्याच्या आयसीसी रँकिंमध्ये घसरण झाली आहे. विराट कोहली 774 गुणांसह आता पाचव्या स्थानावर तर रोहित शर्मा 770 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. 


कशी आहे टॉप 10?


पहिल्या स्थानी पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम 892 गुणांसह आहे. दुसऱ्या स्थानावरही पाकिस्तानचा इमाम हुल् हक 815 गुणांसह आहे. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचे डस्सेन आणि डी कॉक अनुक्रमे 789 आणि 784 गुणांसह विराजमान आहेत. पाचव्या सहाव्या स्थानावर अनुक्रमे विराट कोहली 774 गुणांसह रोहित शर्मा 770 गुणांसह आहेत. सातव्या स्थानावर न्यूझीलंडचा माजी खेळाडू रॉस टेलर 752 गुणांसह तर आठव्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर 737 गुणांसह विराजमान आहे. नवव्या आणि दहाव्या स्थानी इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो आणि ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंट अनुक्रमे 732 आणि 715 गुणांसह विराजमान आहेत.


हे देखील वाचा-