Hardik Pandya Team India: विश्वचषक जिंकल्यानंतर अश्रू थांबत नव्हते, पण दिल्ली विमानतळावर उतरताच हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली VIDEO
Team India at Delhi Airport: टीम इंडियाच्या विश्वचषक विजयाच्या सन्मानार्थ विजय परेडमध्ये सामील व्हा! मुंबईत ओपन डेक बसमधून निघणार भारतीय संघाची विजययात्रा. शेवटच्या सामन्यातील हिरो हार्दिक पांड्या दिल्ली विमानतळावर
नवी दिल्ली: ट्वेन्टी-20 विश्वषचक स्पर्धेचे जेतेपद जिंकून तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या भारतीय संघाचे गुरुवारी सकाळी दिल्ली विमानतळावर आगमन झाले. यावेळी भारतीय संघातील खेळाडूंना (Team India) पाहण्यासाठी दिल्लीकरांनी विमातळावर एकच गर्दी केली होती. विमानतळाच्या परिसरातील रस्ते दुतर्फा क्रिकेटप्रेमींच्या गर्दीने फुलून गेले होते. भारतीय संघ बार्बाडोसवरुन काल संध्याकाळी विशेष विमानाने दिल्लीच्या दिशेने निघाले होते. आज सकाळी भारतीय संघाचे विमान दिल्लीत उतरले. त्यानंतर टीम इंडियातील खेळाडू एक-एक करुन विमानतळाबाहेर पडून बसमध्ये जात होते. त्यावेळी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्यातील शेवटच्या षटकांमध्ये टिच्चून गोलंदाजी करुन ही मॅच भारताच्या बाजूने झुकवण्यात महत्त्वाची भूमिका असणारा हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारतीय क्रीडाप्रेमींचा नजरेस पडला.
हार्दिक पांड्या हा विराट कोहलीच्या पाठोपाठ विमानतळाबाहेर पडला. त्यावेळी चाहत्यांनी हार्दिकच्या नावाचा जयघोष केला. त्यावर हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली. त्यानंतर हार्दिकने क्रीडाप्रेमींच्या दिशेने पाहत हात उंचावून अभिवादन केले.
#WATCH | Virat Kohli, Hardik Pandya, Sanju Samson, Mohammed Siraj along with Team India arrived at Delhi airport, after winning the #T20WorldCup2024 trophy.
(Earlier visuals) pic.twitter.com/eCWvJmekEs
— ANI (@ANI) July 4, 2024
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात क्विंटन डीकॉक आणि हेन्रिक क्लासेन यांनी तडाखेबंद फलंदाजी केली होती. त्यामुळे एकवेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली होती की, हा सामना भारताच्या हातातून निसटला असे दिसत होते. मात्र, हार्दिक पांड्याने प्रथम 18 व्या षटकात धोकादायक क्लासेनचा अडथळा दूर केला. त्यानंतर 20 व्या षटकात हार्दिक पांड्याच्या पहिल्याच चेंडूवर मिलरने जवळपास सिक्स मारला होता, पण सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर अप्रतिम झेल पकडला होता. त्यानंतर पुढील पाच चेंडूत हार्दिक पांड्याने टिच्चून गोलंदाजी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे भारतीय संघाच्या विजयात हार्दिक पांड्याची भूमिका महत्त्वाची राहिली होती.
टीम इंडिया मुंबईत येणार
भारतीय संघ आता काहीवेळ दिल्लीतील आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये आराम करणार आहे. त्यानंतर टीम इंडिया सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी जाणार आहे. यानंतर मुंबईत भारतीय संघाची विजययात्रा काढण्यात येणार आहे. मरिनड्राईव्ह येथून भारतीय संघाची विजयी यात्रा निघेल आणि ती वानखेडे स्टेडियमवर पोहोचेल. भारतीय संघ खुल्या बसमधून रोड शो करणार आहे. त्यामुळे क्रीडाचाहत्यांना वर्ल्डकप आणि भारतीय खेळाडूंना पाहता येणार आहे.
आणखी वाचा
अखेर जे बघण्यासाठी डोळे आसुसले होते तो क्षण आला... रोहित शर्माने एअरपोर्टवर उतरताच वर्ल्डकप उंचावला