4 महिने क्रिकेटपासून दूर, तरीही हार्दिक पांड्यावर कारवाई का नाही? BCCI नं दिलं स्पष्टीकरण!
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांना केंद्रीय करारातून वगळण्यात आले. पण वनडे विश्वचषकानंतर (World cup) मैदानात न परतणाऱ्या हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) बीसीसीआयनं कारवाई का केली नाही?
Hardik Pandya : देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळल्यामुळे श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांना केंद्रीय करारातून वगळण्यात आले. पण वनडे विश्वचषकानंतर (World cup) मैदानात न परतणाऱ्या हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) बीसीसीआयनं कारवाई का केली नाही? ईशान-अय्यरला एक न्याय आणि हार्दिकला दुसरा न्याय का? असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित करण्यात येतोय. यावर आता बीसीसीआयकडून स्पष्टीकरण आले आहे. हार्दिक पांड्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळेल, अशी हमी बीसीसीआयला दिली होती, त्यामुळेच त्याच्यावर कोणताही कारवाई झालेली नाही, इंडियन एक्स्प्रेसनं याबाबतचं वृत्त दिलेय.
हार्दिक पांड्या ए ग्रेडमध्ये -
बीसीसीआयनं हार्दिक पांड्याला केंद्रीय करारामध्ये ए ग्रेडमध्ये जागा दिली आहे. बीसीसीआयकडून हार्दिक पांड्याला वार्षिक पाच कोटींचा पगार दिला जाईल. वनडे विश्वचषकावेळी हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून हार्दिक पांड्या मैदानावर परतलाच नाही. तरीही हार्दिक पांड्याला बीसीसीआयनं करारात कायम ठेवलेय. पण ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर कारवाई केली, अन् हार्दिकवर का नाही? असा सवाल उपस्थित केला जातोय. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टमध्ये याचं उत्तर शोधण्यात आलं आहे.
रिपोर्ट्समध्ये नेमकं काय ?
इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टमध्ये असा दावा केलाय की, हार्दिक पांड्याची दुखापत गंभीर आहे, त्यामुळे मैदानात परतण्यासाठी त्याला खूप वेळ लागणार आहे. त्याशिवाय हार्दिक पांड्यानं बीसीसीआयला देशांतर्गत क्रिकेट खेळेल असा विश्वास दिलाय. ज्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसेल तेव्हा देशांतर्गत क्रिकेटमधील मर्यादीत षटकांच्या सामन्यात खेळेल,असं हार्दिक पांड्याने बीसीसीआयला हमी दिली. हार्दिक पांड्या रेड बॉल क्रिकेटमध्ये कमबॅक करताना दिसणार नाही, त्याचेही कारण यंदा टी 20 विश्वचषकामध्ये हार्दिक पांड्याकडे मोठी जबाबदारी असेल.
बीसीसीआयनं काय म्हटलं ?
केंद्रीय करारापूर्वी बीसीसीआय आणि हार्दिक पांड्या यांच्यामध्ये चर्चा झाली होती. त्यावेळी हार्दिक पांड्यानं बीसीसीआयला हमी दिली. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं म्हटले की, हार्दिक पांड्यासोबत आमची सखोल चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसताना देशांतर्गत व्हाइट बॉल स्पर्धा खेळण्यास सांगितलं. त्यावर त्यानं होकार दिलाय. बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या मूल्यमापनानुसार, रेड बॉल (कसोटी) क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास हार्दिक पांड्या अद्याप तंदुरुस्त नाही. त्यामुळे रणजी क्रिकेट खेळणं कठीण आहे. पण भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळत नसेल तर हार्दिक पांड्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये व्हाइट बॉलवर खेळावं लागेल. हार्दिक पांड्या जर व्हाइट बॉलमध्ये नाही खेळला तर करारातून वगळलं जाईल.
आणखी वाचा :
श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांच्यासाठी टीम इंडियाची दारं कायमची बंद?