Harbhajan Singh slapping Sreesanth : सर्व कॅमेरे बंद झाले होते, तरी 18 वर्षांनंतर हरभजन सिंगने-श्रीसंतला कानाखाली मारलेला Unseen Video व्हायरल, उडाली खळबळ
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2008) पहिल्याच हंगामात घडलेल्या सर्वांत वादग्रस्त घटनेपैकी एक घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Harbhajan Singh slapping Sreesanth Unseen video : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2008) पहिल्याच हंगामात घडलेल्या सर्वांत वादग्रस्त घटनेपैकी एक घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यानंतर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने गोलंदाज एस. श्रीसंत याला मैदानातच कानाखाली लगावली होती. आता तब्बल 18 वर्षांनी या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ललित मोदी यांनी अलीकडेच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कसोबतच्या पॉडकास्टमध्ये या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
यापूर्वी काही महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियात अँड्र्यू सायमंड्ससोबत ‘मंकीगेट’ प्रकरणामुळे हरभजन वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यात भर म्हणजे श्रीसंतला भर मैदानात कानाखाली मारली होती. या प्रकारानंतर हरभजनच्या कारकिर्दीवर काळा डाग लागला. त्याला त्या हंगामातील उर्वरित 11 सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली. एवढेच नाही तर बीसीसीआयने त्याच्यावर आणखी पाच एकदिवसीय सामन्यांची बंदी ठोठावली होती.
View this post on Instagram
ललित मोदीने सांगितलं नेमकं काय झालं होतं?
मायकेल क्लार्कच्या पॉडकास्टमध्ये ललित मोदींनी मोठा खुलासा केला की, त्यांनी हरभजन सिंग आणि श्रीसंत यांच्यातील वादाचा वादग्रस्त व्हिडीओ तब्बल 17 वर्षं लपवून ठेवला होता. क्लार्कशी बोलताना मोदी म्हणाले, “मी तुला सांगतो काय झालं होतं. माझ्याकडे तो व्हिडीओ आहे आणि मी तो तुला दाखवेन. मी तो जपून ठेवला होता. भज्जी माझा खूप चांगला मित्र आहे, मला तो खूप आवडतो. हे मैदानावर घडलं आणि मी तिथेच होतो. हा किस्सा भज्जी आणि श्रीसंत यांच्यातील आहे. सामना संपल्यानंतर सर्व कॅमेरे बंद झाले होते. फक्त माझा एक सिक्युरिटी कॅमेरा सुरू होता. खेळाडू एकमेकांना हात मिळवत होते, हाय-फाईव्ह करत होते. तेव्हा जेव्हा श्रीसंत आणि भज्जी आमनेसामने आले, तेव्हा भज्जीनं त्याला बोलावलं आणि उलट्या हातानं एक कानाखाली मारली.”
हरभजन श्रीसंतवर का भडकला?
25 एप्रिल 2008 रोजी मोहालीत पंजाबकडून मुंबई इंडियन्सला 66 धावांनी पराभव पत्करावा लागला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू हात मिळवत होते. त्याच वेळी मुंबईचा कर्णधार हरभजन या पराभवानं चिडलेला होता. दरम्यान, श्रीसंत हसत त्याला “हार्ड लक” असं म्हणाला. ही टिप्पणी भज्जीला चांगलीच लागली आणि त्यानं श्रीसंतला उलट्या हातानं लगावली. अलीकडेच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ते स्पष्टपणे दिसत आहे.




















