(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Happy Birthday Sanath Jayasuriya: पार्टटाईम खेळाडू म्हणून संघात सामील झाला, अन् त्यानंच जिंकवला श्रीलंकेला वर्ल्डकप!
Happy Birthday Sanath Jayasuriya: एक संधी मिळाली आणि त्यानं स्वत:ला सिद्ध करून दाखवलं
Happy Birthday Sanath Jayasuriya: जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक असलेला श्रीलंकेचा माजी दिग्गज सनथ जयसूर्या आज 30 जून 2022 रोजी त्याला 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. जयसूर्यानं फिरकी गोलंदाज म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याचा संघात पार्ट टाईम फलंदाज आणि फिरकीपटू म्हणून वापर केला गेला. पण एक संधी मिळाली आणि त्यानं स्वत:ला सिद्ध करून दाखवलं. त्यानंतर तो त्याच्या काळातील सर्वात धोकादायक फलंदाजांमध्ये गणला जाऊ लागला. 1996 च्या विश्वचषकात त्यांनं जबरदस्त प्रदर्शन करून दाखवलं आणि श्रीलंकेच्या संघाला विश्वचषकही जिंकून दिला.
जयसूर्यानं 1988 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेच्या संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतर त्याची पाकिस्तान दौऱ्यासाठी श्रीलंकेच्या 'ब' संघात निवड झाली. पाकिस्तानात जाऊन त्यानं दोन धमाकेदार द्विशतक झळकावली.ज्यानंतर त्याला श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाली. त्यानं 1989 मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. त्यानंतर क्रिकेटविश्वात त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली. जयसूर्यानं आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. ज्यातील काही विक्रम आजही अबाधित आहेत.
जयसुर्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
सनथ जयसूर्यानं श्रीलंकेसाठी 445 एकदिवसीय आणि 110 कसोटी सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 28 शतकांच्या मदतीनं त्यानं 13 हजार 430 धावा केल्या आहेत. तर, कसोटी क्रिकेटमध्ये 6 हजार 373 (14 शतक) धावा करत 98 विकेट्सही घेतल्या आहेत. याशिवाय त्यानं श्रीलंकेसाठी 31 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात 628 धावा आणि 19 विकेट्स घेतल्या आहेत. महत्वाचं म्हणजे, 1996 च्या विश्वचषकात श्रीलंकेला चॅम्पियन बनवण्यात जयसूर्यानं महत्वाची भूमिका बजावली होती.
जयसूर्याचा 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
क्रिडाविश्वात खळबळ माजवणाऱ्या सनथ जयसूर्या नावाचं वादळ 2011 मध्ये थांबलं. क्रिकेटला अलविदा केल्यानंतर त्यानं राजकारणात प्रवेश केला. तसेच 2013 मध्ये तो श्रीलंकेच्या निवड समितीचे अध्यक्ष झाला होता. मात्र 2015 मध्ये श्रीलंका संघाच्या खराब कामगिरीनंतर त्यांना हे अध्यक्षपद सोडावं लागलं होतं.
हे देखील वाचा-