Asia Cup 2022 : 'हे असं अधिक काळपर्यंत होणं योग्य नाही,' ऋषभ पंतच्या संघात नसण्यावर गंभीरचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाला...
Asia Cup 2022 : आशिया कप 2022 मधील सलामीच्या सामन्यातच पाकिस्तानला भारताने मात दिली. यावेळी संघात ऋषभ पंत नसल्याने अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केले.
Gautam Gambhir On Rishabh Pant : आशिया कप 2022 च्या (Asia Cup 2022) सलामीच्या सामन्यातच भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्ने विजय मिळवला. अटीतटीच्या सामन्यात भारताने विजय मिळवला असला तरी पाकिस्तानने दिलेली झुंजही अगदी कडवी होती. त्यामुळे भारतीय संघाचा खेळ कुठेतरी कमी पडला अशाही प्रतिक्रिया येत आहेत. त्यात संघातील स्टार खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) संघात नसल्यानेही अनेक प्रतिक्रिया येत होत्या. त्यात माजी खेळाडू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) दिलेली प्रतिक्रियाही महत्त्वाची असून त्याने संघ व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली आहे.
पाकिस्तान संघाविरुद्ध सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने फिनिशर म्हणून यष्टीरक्षक फलंदाजाची जागा ऋषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिक याला दिली. कार्तिकने मागील वर्षभरात खासकरुन आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली. पण पंतचा फॉर्मही कायम असल्याचं दिसून आलं आहे. त्यामध्ये यंदा टी20 विश्वचषक (T20 World Cup 2022) होणार असून त्यापूर्वी संघात इतके आणि सततचे बदल करणं योग्य नाही असं गंभीरनं म्हटलं आहे.
बॅकअप असणं योग्य, पण X Factor आहे पंत
पाकिस्तानविरुद्ध ऋषभ पंत अंतिम 11 मध्ये नव्हता. त्यामुळे अनेक प्रतिक्रिया यावेळी समोर आल्या. याबद्दल बोलताना गंभीर म्हणाला, ''टी20 विश्वचषकासाठी अधिक काळ उरलेला नाही. भारतीय संघाकडे आशिया कपनंतर केवळ 5 ते 6 टी20 सामनेच सरावासाठी आहेत. अशामध्ये भारताकडे बॅकअप म्हणून खेळाडू असणं ठिक आहे, पण ऋषभ पंत संघातील एक्स फॅक्टर असल्याने त्यला अंतिम 11 मध्ये ठेवायलाच हवं. तसंच भारतीय संघाच्या फलंदाजीमध्ये मधल्या फळीत डावखुरा फलंदाज असणं आवश्यक असल्याचंही गंभीर म्हणाला.
भारताचा 5 विकेट्सनी विजय
पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला केएल राहुलच्या रुपात पहिला धक्का बसला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं 46 चेंडूत 49 धावांची भागेदारी करत संघाचा डाव सावरला. या सामन्यात रोहित शर्मा 12 तर, विराट कोहली 35 धावा करून बाद झाला. यानंतर रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्यानं दमदार फंलदाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचले. दोघांमध्ये पाचव्या विकेट्ससाठी 52 धावांची भागेदारी झाली. अखेरच्या षटकात भारताला 7 धावांची गरज असताना रवींद्र जाडेजा आऊट झालाय. परंतु, हार्दिक पांड्यानं विजयी षटकार ठोकून पाकिस्तानला पराभूत केलं. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजन सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, नसीम शाहनं पदार्पणाच्या सामन्यात दमदार प्रदर्शन करत भारताच्या दोन फलंदाजांना पव्हेलियनमध्ये धाडलं. भारताचा पुढील सामना आता 31 ऑगस्ट रोजी हाँगकाँग संघाविरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात होणार आहे.
हे देखील वाचा-