#BirthdaySpecial: मैदानावर पेय नेण्यास नकार दिल्याने जेव्हा संघातून वगळलं होतं; गांगुलीच्या 'दादा'गिरीचे न ऐकलेले किस्से
'प्रिन्स ऑफ कोलकाता', 'लॉर्ड ऑफ द ऑफसाइड' आणि 'दादा' म्हणून ओळखल्या जाणार्या सौरव गांगुलीने 11 जानेवारी 1992 रोजी भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
Sourav Ganguly Birthday: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आज 49 वर्षांचा झाला आहे. सध्या, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची गणना जगातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये केली जाते. भारतीय क्रिकेट संघाला फिक्सिंगच्या सापळ्यातून बाहेर काढत नव्या टीम इंडियाची उभारणी करणारा कर्णधार म्हणजे सौरव गांगुली. गांगुलीला दादागिरीसाठीही ओळखले जाते.
'प्रिन्स ऑफ कोलकाता', 'लॉर्ड ऑफ द ऑफ साइड' आणि 'दादा' म्हणून ओळखल्या जाणार्या सौरव गांगुलीने 11 जानेवारी, 1992 रोजी भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. लॉर्ड्समधील पदार्पणाच्या कसोटीतही त्याने शतक झळकावले. गांगुलीने 146 एकदिवसीय आणि 49 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाची जबाबदारी स्वीकारली. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघ 76 एकदिवसीय सामने आणि 21 कसोटी सामने जिंकला आहे तर 15 कसोटी सामने अनिर्णित राहिले. सौरव गांगुलीने 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाला 2-1 ने हरवून केवळ ऐतिहासिक विजय मिळविला नाही तर परदेशी भूमीवर मालिका जिंकण्याची टीम इंडियाला सवय लावली.
सौरव गांगुलीचा जन्म 08 जुलै 1972 रोजी कोलकाता येथे झाला. सुरुवातीला दादाला फुटबॉलमध्ये करिअर करायचं होतं, पण त्याचा मोठा भाऊ क्रिकेटपटू असल्यामुळे त्यानेही क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आज, दादाच्या वाढदिवशी आम्ही त्याच्या दादागिरीच्या काही न ऐकलेल्या गोष्टी सांगणार आहोत.
हरभजनला संघात घेत नाही तोपर्यंत रुममधून बाहेर निघणार नाही
ही 2001 सालची गोष्ट आहे. त्यावेळी दादा नुकताच कर्णधार झाला होता. पण, त्याची दादागिरी काही कमी नव्हती. ही घटना बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीबद्दल आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघाची निवड होणार होती. आपल्याला संघात हरभजन सिंग हवा होता, असे दादा म्हणाले. मात्र, निवड समिती त्याच्याशी सहमत नव्हती. निवडकर्त्यांना भज्जीमध्ये जी गोष्ट दिसली नाही, ती दादाने हेरली होती. त्याने स्पष्टपणे सांगितले की, हरभजन संघात येईपर्यंत मी खोली सोडणार नाही.
यानंतर निवडकर्त्यांना झुकावं लागले आणि भज्जी संघात आला. त्या सामन्यात हरभजनने रिकी पॉन्टिंग, अॅडम गिलक्रिस्ट आणि शेन वॉर्नला बाद करून हॅटट्रिक केली. त्याने पहिल्या डावात सात आणि दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या. यापुढचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे.
जेव्हा मैदानावर ड्रिंक्स नेण्यास नकार दिल्याने दादाला संघातून वगळलं
जेव्हा दादा संघात नवीन होता. त्याला वरिष्ठ खेळाडूसाठी मैदानावर पेय आणण्यास सांगितले गेले. पण, दादाने तसे करण्यास नकार दिला. अनेक रिपोर्टमध्ये सांगितले, की दादाला त्यांची सांगण्याची पद्धत आवडली नाही. आणि म्हणूनच त्याने मैदानात पेय नेण्यास नकार दिला. यानंतर दादाला संघातून वगळण्यात आले होते.
फिल्मी स्टाईल लग्न
फारच थोड्या लोकांना माहिती आहे की दादाने आपली प्रेयसी डोना रॉयसोबत पळून जाऊन लग्न केलंय. वास्तविक, यापूर्वी दोन्ही कुटुंबे या लग्नास सहमत नव्हती. यानंतर, दादा आणि डोना यांनी घरातून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. नंतर त्यांचे कुटुंब सहमत झाले आणि 21 फेब्रुवारी 1997 रोजी सौरव गांगुली आणि डोना रॉय यांचा औपचारिक विवाह झाला.
अशा प्रकारे डावखुरा फलंदाज झाला
फलंदाजीशिवाय सौरव गांगुली आपली सर्व कामे उजव्या हाताने करतो. तो गोलंदाजी, लेखन आणि जवळजवळ प्रत्येक गोष्ट आपल्या उजव्या हाताने करतो. मात्र, तो डाव्या हाताने फलंदाजी करायला शिकला. जेणेकरून त्याचा भाऊ स्नेहाशीष गांगुलीची क्रिकेट किट वापरता येईल.
टी-शर्ट काढून इंग्लंडला प्रत्युत्तर
सौरव गांगुलीचे नाव ऐकल्यावर प्रत्येक भारतीयाने लॉर्ड्सच्या बाल्कनीत टी-शर्ट काढल्याचे चित्र समोर येतं. पण त्याने हे का केले हे तुम्हाला माहिती आहे का? वास्तविक, अष्टपैलू अँड्र्यू फ्लिंटॉफने मुंबईच्या वानखेडे येथे इंग्लंड जिंकल्यानंतर मैदानावर टी-शर्ट काढला होता. त्याला उत्तर देताना दादाने लॉर्ड्समधील भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर टी-शर्ट काढून आनंद व्यक्त केला.