धार्मिक स्वातंत्र्याशी तडजोड करु नये, कराचीतील जोगमाया मंदीर घटनेवर पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरियाचा संताप
पाकिस्तानमधील कराची येथील जोगमाया मंदीरात तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. या घटनेवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने संताप व्यक्त केला आहे.
पाकिस्तानमधील (Pakistan) कराची येथील जोगमाया मंदीरात झालेल्या तोडफोडीच्या घटनेवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने संताप व्यक्त केलाय. कराचीच्या मध्यभागी असलेल्या या मंदीरात तोडफोड होणे ही गंभीर बाब आहे. धार्मिक स्वातंत्र्याशी कोणत्याही प्रकारे तडजोड केली जाऊ नये. अशा घटनांमुळे पाकिस्तानची बदनामी होत आहे. त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांनी याबाबत कारवाई करण्याची विनंती कनेरियाने केली आहे. कनेरियाने ट्वीट करत या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
दानिश कनेरियाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनाही ट्वीट टॅग केले आहे. जोगमाया मंदिर हे सिंध प्रांतातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. ते नारायणपुरा, कराची येथे येते. नवरात्रीदरम्यान या मंदिराचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. परंतू, 20 डिसेंबर 2021 च्या रात्री मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांत हे एकमेव राज्य आहे, जिथे हिंदू सर्वाधिक संख्येने राहतात. कराचीच्या नारायणपुरा भागात हिंदूंशिवाय शीख आणि ख्रिश्चन या धर्माचे लोकही राहतात. या परिसरात सहा मोठी मंदिरे असून, त्यात जोगमाया मंदिराचाही समावेश आहे. जोगमाया मंदिर हे येथील सर्वात जुने मंदिर मानले जाते.
गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानातील मंदिरे सातत्याने ही अतिरेक्यांच्या निशाण्यावर आहेत. जोगमाया मंदिरापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये हनुमान देवीमाता मंदिरालाही लक्ष्य करण्यात आले होते. या मंदिरातून चोरट्यांनी दागिने व हजारो रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. हे मंदिर सिंध प्रांतातीलच आहे. गेल्या महिन्यात सिंध प्रांतातील कोत्री येथील मंदिरातही काही लोक घुसले होते. तिथेही मूर्तींची मोडतोड करुन, लाखो रुपयांची रोकड लंपास करण्यात आली होती. तसेच कृष्ण जन्माष्टमीपूर्वी कृष्ण मंदिरातही तोडफोड झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून हिंदू मुलींचे अपहरण झाल्याच्या बातम्याही येत आहेत. त्यामुळे पाकिस्तानातील अल्पसंख्याक समुदाय आता पाकिस्तानचे सरन्यायाधीश गुलजार अहमद यांच्याकडे न्यायाची मागणी करत आहे.
नोव्हेंबर 2021 मध्ये खैबर पख्तूनख्वा प्रांतातील 100 वर्ष जुन्या श्री परमहंसजी महाराज मंदिराच्या पुनर्बांधणीनंतर, त्याचे उद्घाटन पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांच्या हस्ते करण्यात आले होते. डिसेंबर 2020 मध्ये या मंदिरावर कट्टरवाद्यांनी हल्ला केला होता. हल्लेखोर जमियत उलेमा-ए-इस्लाम फजल (JUI-F) या संघटनेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर सरन्यायाधीश अहमद यांनी मंदिर पुन्हा बांधण्याचे आदेश दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: