IND vs SL: श्रीलंकेचा कर्णधार शनाका केवळ 5 धावा करताच रोहित शर्माला टाकणार मागे, नावावर होणार मोठा रेकॉर्ड
IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका कमाल फॉर्मात दिसून येतो. त्याची दमदार फलंदाजी भारतासाठी चिंतेचा विषय आहे.
Dasun Shanaka against Team India : भारत आणि श्रीलंका(IND vs SL) यांच्यातील टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना उद्या अर्थात 7 जानेवारी रोजी राजकोट येथे रंगणार आहे. विशेष म्हणजे या तिसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका (Dasun Shanaka) फक्त 5 धावा करून मोठा विक्रम नावावर करू शकतो. हा मोठा रेकॉर्ड करताच शनाका भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माला (Rohit Sharma) मागे टाकू शकतो.
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या T20 सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 19 सामन्यांच्या 17 डावात 24.17 च्या सरासरीने आणि 144.21 च्या स्ट्राईक रेटने 411 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, श्रीलंकेच्या कर्णधाराने भारताविरुद्धच्या 21 टी-20 सामन्यांच्या 19 डावांमध्ये 31.30 च्या सरासरीने आणि 141.31 च्या स्ट्राइक रेटने 407 धावा केल्या आहेत. आता रोहित शर्माचा हा विक्रम मोडण्यासाठी शनाकाला फक्त 5 धावांची गरज आहे. शनाकाने मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात ज्या प्रकारे 56 धावांची धडाकेबाज खेळी खेळली ते पाहता पुढील सामन्यात तो हा मोठा विक्रम करेल अशी दाट शक्यता आहे. मागील सामन्यात त्याने 22 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांसह 56 धावा केल्या होत्या.
'करो या मरो'चा सामना राजकोटमध्ये होणार आहे
मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket association Stadium) होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघ 2 धावांनी जिंकला होता तर दुसरा सामना श्रीलंका संघाने 16 धावांनी जिंकला आहे. आता तिसरा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकणार आहे. भारताने आतापर्यंत राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर चार आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत. यादरम्यान तीन सामने जिंकले. एका सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. टीम इंडियाने आपला पहिला T20 सामना ऑक्टोबर 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. या सामन्यात भारताने 6 गडी राखून विजय मिळवला. यानंतर दुसरा सामना नोव्हेंबर 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला गेला. या सामन्यात भारताला 40 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. टीम इंडियाने 2019 आणि 2022 मध्ये सामने जिंकले होते. त्याने बांगलादेशचा 8 विकेट्सने तर दक्षिण आफ्रिकेचा 82 धावांनी पराभव केला. श्रीलंकेचा संघ प्रथमच या मैदानावर सामना खेळणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील हा सामना निर्णायक ठरणार आहे.
हे देखील वाचा-