नताशाला हार्दिक पांड्याकडून पोटगी मिळणार का? पोटगीचं नेमकं गणित काय? वाचा!
क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि मॉडेल, अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात आलबेल नसल्याचे सांगितले जात होते.
मुंबई : जगप्रसिद्ध क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्ट्रॅनकोविक (Natasa Stankovic) यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. तशी अधिकृत घोषणा या दोघांनीही केली आहे. हा निर्णय घेणं अवघड होतं. आमचा मुलगा अगस्त्या याची सहपालक म्हणून काळजी घेऊ, असं हार्दिक आणि नताशा यांनी जाहीर केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दाम्पत्यात सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता हे दोघेही वेगळे झालेले आहेत. दरम्यान, हार्दिक आणि नताशा विभक्त होणार असल्यामुळे कायदेशीर प्रक्रियेद्वारे नताशाला हार्दिककडून पोटगी मिळणार का? असे विचारले जात आहे. पोटगी मिळणार असेल तर ती किती असेल? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.
हार्दिक पांड्याकडे संपत्ती किती? (Net worth of Hardik Pandya)
हार्दिक पांड्या हा प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. त्याला वेगवेगळ्या जाहिराती, बीसीसीआय, आयपीएल अशा वेगवेगळ्या माध्यमातून पैसे मिळतात. सध्या चालू वर्षात हार्दिक पांड्याकडे एकूण 91 कोटी रुपयांची संपत्ती आहे, असे म्हटले जाते. हार्दिक पांड्या महिन्याला सरासरी 1.2 कोटी रुपये कमवतो. याआधी तो महिन्याला 25 लाख रुपये कमवायचा.
आलिशान घर, महागड्या गाड्या (Hardik Pandya Net Assets)
हार्दिक पांड्या बीसीसीआयच्या करार यादीत ग्रेड ए विभागात आहे. या करारानुसार बीसीसीआयकडून हार्दिकला वर्षाला पाच कोटी रुपये मिळतात. त्यानंतर आयपीएलच्या सामन्यांत खेळल्यामुळे त्याला एका हंगामात 15 कोटी रुपये मिळतात.त्याच्याकडे अनेक महागडी घरं आहेत. वडादरामध्ये त्याच्याकडे 6000 स्क्वेअर फुटाचे पेटंहाऊस आहे. या घराची किंमत साधारण 3.6 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. हार्दिक पांड्याकडे ऑडी ए-6, लँबोर्गिनी, रेंज रोव्हर, जीप, मर्जीडीज, रोल्स रॉयसी, पोर्शे, टोयोटा अशा महागड्या गाड्या आहेत.
हार्दिक-नताशा विभक्त, आता पोटगीचं काय? (Will Natasa Stankovic get Alimony)
तसं पाहायचं झालं तर भारतात पोटगी किंवा घटस्फोटानंतर जोडीदाराकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक पाठिंब्याबाबत वेगवेगळे कायदे आहेत. हिंदू विवाह कायदा, विशेष विवाह कायदा, भारतीय घटस्फोट कायदा, मुस्लीम महिला कायदा,पारसी विवाह आणि घटस्फोट कायदा, अशा वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत पोटगीची प्रक्रिया नियंत्रित केली जाते. एखाद्या जोडीदाराने दुसऱ्या जोडीदाराला किती पोटगी द्यायची हे ठरवण्यासाठी वेगवेगळ्या बाबींचा विचार केला जातो.
न्यायालय नेमका काय विचार करते?
पोटगीसंदर्भात निर्णय घेताना न्यायालय पती-पत्नीची संपत्ती किती आहे? त्यांच्या जगण्याचा स्तर काय आहे? त्यांचे वय किती आहे? त्यांची प्रकृती कशी आहे? लग्नाला किती वर्षे झालेली आहेत? दाम्पत्याचे मूल कोणाकडे असेल? मुलाच्या गरजा काय आहेत? अशा वेगवेगळ्या बाबींचा विचार केला जातो. एखादी महिला काम करत असली तरी महिला आणि तिच्या पतीच्या कमाईत मोठी तफावत असेल तर संबंधित महिलेला पोटगी मिळू शकते.
...तर पोटगीची रक्कम कमी होऊ शकते
तर दुसरीकडे संबंधित महिला आर्थिक दृष्टीकोनातून स्वत:ला सांभाळण्यास सक्षम असेल पोटगीची रक्कम कमी होऊ शकते किंवा ती मिळतही नाही. दाम्पत्य विभक्त झाल्यानंतर जोडीदाराची आर्थिक दृष्टीने अडचण होऊ नये, हा न्यायालयाचा प्रयत्न असतो. घटस्फोटाची रक्कम ही प्रत्येक महिन्याला किंवा एकरकमी दिली जाऊ शकते.
नताशाला पोटगी मिळणार का?
दरम्यान, नताशा आणि हार्दिक पांड्या यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे न्यायालय पोटगी देण्यासंदर्भात विचार करू शकते. पण नताशाला पोटगी मिळणार का? मिळणार असेल तर त्यासाठीचे निकष काय असतील? पोटगी नेमकी किती असेल? याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.
हेही वाचा :
Hardik-Natasa Divorce : हार्दिक - नताशाचा घटस्फोट, मुलगा अगस्त्य कोणाकडे राहणार?