Cricket for Olympics: 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता, आयसीसी दावा सादर करणार
Cricket for Olympics: आयसीसीने लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी दावा सादर करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. याआधी 1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता.
Cricket for Olympics: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी दावा सादर करणार आहे. याला दुजोरा देत आयसीसीने म्हटले आहे की, क्रिकेटला ऑलिम्पिकचा भाग बनवण्यासाठी दावा सादर करण्यासाठी लॉस एंजेलिसमध्ये एक समिती स्थापन करण्यात आली आहे. आता जर आयसीसी या दाव्यात यशस्वी ठरली तर ऑलिम्पिकमध्ये प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर क्रिकेट स्पर्धा खेळली जाईल.
आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बर्कले यांनी मंगळवारी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले आहे, "क्रिकेट खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळवण्यासाठी आम्ही एकत्र आला आहोत. आम्ही ऑलिम्पिकला क्रिकेटच्या भविष्याचा भाग म्हणून पाहतो. कोट्यवधी चाहत्यांना हा खेळ ऑलिम्पिकमध्ये सहभागी व्हावं असं वाटतं." ते असेही म्हणाले, की "क्रिकेटचा चाहता वर्ग खूप मजबूत आणि उत्कटतेने भरलेला आहे. विशेषतः दक्षिण आशियामध्ये जिथे या खेळाचे 92 टक्के पेक्षा जास्त चाहते आहेत. तसेच, अमेरिकेतही क्रिकेटचे 10 कोटींहून अधिक चाहते आहेत. या चाहत्यांसाठी, त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंना ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्याचा हा अनुभव खूप खास असेल."
ECB चे अध्यक्ष इयान व्हॉटमोर समितीचे नेतृत्व करतील
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष इयान व्हॉटमोर आयसीसीच्या या समितीचे नेतृत्व करतील. त्यांच्यासोबत या समितीमध्ये आयसीसीचे स्वतंत्र संचालक इंदिरा नूयी, झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तवेंग्वा मुकुहलानी, आयसीसीचे सहयोगी सदस्य संचालक आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे उपाध्यक्ष महिंदा वल्लीपुरम आणि यूएसए क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष पराग मराठे यांचा समावेश आहे. कमिटीच्या सर्व सदस्यांचे मत आहे की ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटसाठी दावा सादर करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे.
1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता
यापूर्वी 1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता. सुरुवातीला बेल्जियम, फ्रान्स, ब्रिटन आणि नेदरलँडच्या संघांनी क्रिकेट स्पर्धेसाठी संघ पाठवण्याचे मान्य केले होते. तथापि, बेल्जियम आणि नेदरलँड्सने नंतर या स्पर्धेतून माघार घेतली, त्यानंतर ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात दोन दिवसांचा फक्त एक सामना खेळला गेला.
या सामन्याच्या पहिल्या डावात ब्रिटनच्या संघाने 117 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तर म्हणून फ्रान्सचा पहिला डाव फक्त 78 धावांवर गारद झाला. यानंतर ब्रिटनने आपल्या दुसऱ्या डावात 145 धावा केल्या आणि सामना जिंकण्यासाठी फ्रान्सला 185 धावांचे लक्ष्य दिले. पण फ्रान्सचा संघ त्यांच्या दुसऱ्या डावात केवळ 26 धावांवर आलआउट झाला आणि ब्रिटनने सामना 158 धावांनी जिंकला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) 1912 साली हा सामना अधिकृतपणे मान्य केला आणि विजेते ब्रिटनला सुवर्णपदक आणि फ्रान्सला रौप्य पदक बहाल केले.