क्रिकेटर पृथ्वी शॉला कोर्टाकडून दुसरं समन्स जारी; 1 ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश
Cricketr Prithvi Shaw: सेल्फी घेण्यावरून पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यात झालेला वाद नंतर एअरपोर्ट परिसरात रस्त्यावर हाणामारीपर्यंत पोहचला होता.
Cricketr Prithvi Shaw मुंबई: सोशल मीडिया स्टार सपना गिल (Sapna Gill) सेल्फी प्रकरणी क्रिकेटर पृथ्वी शॉ (Prithwi Shaw) याला कोर्टाकडून दुसरं समन्स जारी करण्यात आलं आहे. या समन्सद्वारे 1 ऑक्टोबरला मुंबई सत्र न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याआधी 30 एप्रिलला कोर्टाने पृथ्वी शॉला पहिलं समन्स बजावलं होतं.
फेब्रुवारी 2023 मध्ये एका हॉटेलमध्ये सेल्फी घेण्यावरून पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यात झालेला वाद नंतर एअरपोर्ट परिसरात रस्त्यावर हाणामारीपर्यंत पोहचला होता. घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पृथ्वीच्या तक्रारीवरून सपनासह 8 जाणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सपना गिलला पोलीसांनी अटकही केली होती. त्यानंतर सपना गिलनं याप्रकरणी पृथ्वी शॉविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील हॉटेलबाहेर भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ याचा एका तरुणीसोबत वाद झाला. सेल्फी घेण्यावरुन हा वाद झाला असल्याचं समोर आलं. पृथ्वी शॉसोबत सेल्फी काढताना हाणामारी झाल्याचं यात सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना जोगेश्वरी लिंक रोड येथील लोटसच्या पेट्रोल पंपाजवळ घडल्याची माहिती आहे. पृथ्वी शॉच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉ याचा एका हॉटेलात पार्टी सुरु असताना सेल्फी काढण्यावरुन वाद झाला. त्यानंतर हॉटेलमधून शॉ दुसऱ्या कारने घराकडे निघाला होता. त्यादरम्यान त्याच्या मित्राच्या कारमध्ये तो असल्याचं संबधितांना वाटलं आणि तरुणी आणि तिच्या मित्रांनी त्या कारवर हल्ला केला.
सपना गिलला केली होती अटक-
सपना गिलने पृथ्वीच्या मित्राच्या गाडीच्या काचा फोडल्या असा आरोप आहे. त्यानंतर अभिनेत्री सपना गिलला पोलिसांनी अटक केली होती. सपना नंतर जामीनावर बाहेर आली होती. सपना गिल हिने याप्रकरणी कोर्टात धाव घेतली होती. पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र आशिष सुरेंद्र यादव यांच्याविरोधात सपना गिल हिने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, पोलिसांनी भादवि कलम 354, 509, 324 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्राविरुद्ध विनयभंग आणि बॅटने मारणे यासह अनेक प्रकरणासह सपना गिलने तक्रार दाखल केली होती. एवढेच नाही तर सपनाने सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्रही दिले आहे. यामध्ये तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाचा उल्लेख होता.
कोण आहे सपना गिल?
सपना गिल भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. सपना तिचं ग्लॅमर आणि अभिनयाच्या जोरावर भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये हळूहळू आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहे. सपना गिल सध्या 26 वर्षांची आहे. सपनाचा जन्म पंजाबची राजधानी चंदीगड येथे झाला. सपनाने 'काशी अमरनाथ' आणि 'निरहुआ चलल लंदन' या चित्रपटांमध्ये भोजपुरी सुपरस्टार अभिनेता रवि किशन आणि दिनेश लाल यादव 'निरहुआ' यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या अद्याप एवढी प्रसिद्धी मिळाली नसली. तरी पृथ्वी शॉसोबतच्या वादामुळे सपना गिल चर्चेत आली आहे.