कपिल देवचा तो अफलातून कॅच अन् सूर्याचा आताचा कॅच टर्निंग पॉईंट; क्रिकेटप्रेमी मुख्यमंत्र्यांनी 'माझा'वर आठवणी सांगितल्या
Eknath Shinde Wishes To Team India : मुंबईमध्ये गर्दीचा महापूर उसळला असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
मुंबई : मी 1983 सालचा तो कपिल देवचा (Kapil Dev) अफलातून कॅचही पाहिला आणि आताचा टर्निंग पॉईंट ठरलेला सूर्याचा (Suryakumar Yadav) कॅचही पाहिला अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केल्या. विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत केलं जात आहे, टीम इंडियाचे आपण आभार मानतो असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, भारतीय क्रिकेट टीमचं अभिनंदन करतो. मुंबईत चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळली आहे, चाहत्यांचा उत्साह दिसून येतोय. पण अशावेळी टीमची गैरसोय होऊ नये, चाहत्यांचीही गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी. तसेच मरिन ड्राईव्हवर गर्दी करू नये.
सूर्याचा तो कॅच टर्निंग पॉईंट
विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहिला असं सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी भारत-आफ्रिका सामना पाहिला. 1983 सालचा कपिल देवचा अफलातून कॅच पाहिला होता. आता सूर्यकुमार यादवने घेतलेला कॅचही पाहिला, तो टर्निंग पॉईंट ठरला. मी मुख्यमंत्री असताना मुंबईत हा कार्यक्रम होतोय ही अभिमानाची बाब आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पोलिस आयुक्तांना सूचना
प्रचंड संख्यने जमलेल्या उत्साही क्रिकेट प्रेमींची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. टी-20 विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जमलेल्या क्रिकेट प्रेमींच्या गर्दींचे नियत्रण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत.
विजयवीर संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरीमन प्वाईंट ते स्टेडियम दरम्यान, मरिन ड्राईव्ह या परिसरात मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे वाहतुक विस्कळीत होऊ नये तसेच जमलेल्या क्रिकेट प्रेमींचीही गैरसोय होऊ नये याकडे मुंबई पोलीस दल आणि संबंधित यंत्रणांनी लक्ष पुरवावे, अनुषांगिक उपाययोजना कराव्यात अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिल्या आहेत.
ही बातमी वाचा: