टीम इंडियाचा पाकिस्तानात जाण्यास नकार; बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दोन देशांची नावं सुचवली!
ICC Champions Trophy 2025: आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तानात होणार आहे.
ICC Champions Trophy 2025: आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (ICC Champions Trophy 2025) टीम इंडियाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तानात होणार आहे. यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने तयारी देखील सुरु केली आहे. मात्र याआधी बीसीसीआयने पाकिस्तानला धक्का दिला आहे.
पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवणार आहे. 1996 च्या विश्वचषकानंतरची ही पहिली आयसीसी स्पर्धा असेल जी पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या वेळापत्रकाला आयसीसीने देखील मंजुरी दिली आहे. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने आयसीसी आता काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बीसीसीआयने दोन देशांची नावं सुचवली-
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी बीसीसीआयने आयसीसीला दोन देशांची नावं सुचवली आहे. बीसीसीआयने दुबई किंवा श्रीलंकेत सामने आयोजित करण्याचे सुचवलं आहे.
Indian Cricket team is unlikely to travel to Pakistan for the 2025 ICC Champions Trophy. BCCI will ask ICC to host matches in Dubai or Sri Lanka: BCCI sources to ANI pic.twitter.com/o7INJKhk1E
— ANI (@ANI) July 11, 2024
चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलवर?
बीसीसीआयने अनेकवेळा आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही, असे बीसीसीआयचे मत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानात न गेल्यास ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर आयोजित केली जाईल. ज्या अंतर्गत भारताचे सामने दुबई किंवा इतर कोणत्याही ठिकाणी खेळवले जातील.
आशिया चषकासाठी बीसीसीआयने दिला होता नकार-
गेल्या वर्षी आशिया चषक 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता, ज्याचे आयोजन पाकिस्तानने केले होते, परंतु भारताने तेथे खेळण्यास नकार दिला होता. याच कारणामुळे भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत झाले. यावेळीही असेच काही घडण्याची अपेक्षा आहे.
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर-
राहुल द्रविडनं आयसीसी वनडे विश्वचषकानंतर मुख्य प्रशिक्षक पद सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रोहित शर्माच्या विनंतीनंतर त्यानं टी-20 विश्वचषकपर्यंत पदावर कायम राहण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयनं राहुल द्रविडला 2027 च्या वनडे विश्वचषकापर्यंत पदावर राहण्याची विनंती केली होती. मात्र, राहुल द्रविडनं नकार दिल्यानंतर नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु झाला होता. भारताच्या टी-20 आणि वनडे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या गौतम गंभीरला भारताचं मुख्य प्रशिक्षक पद सोपवण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या:
आता हार्दिक पांड्याच्या फोटोची रंगली चर्चा; नताशानेही साधलं टायमिंग, कोण आहे ती मिस्ट्री गर्ल?
हार्दिक पांड्याच्या मागची विघ्नं संपता संपेना; पुन्हा संशायाची पाल चुकचुकली, नेमकं काय घडलं?