Rohit Sharma Ind vs End : हिटमॅनच टीम इंडियाचा राजा! इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये रोहित शर्माच कर्णधार, बीसीसीआयच्या निर्णयाने शिक्कामोर्तब
बीसीसीआयने केंद्रीय कराराची घोषणा केल्यानंतर रोहित शर्मा सध्या कसोटी क्रिकेटपासून दूर राहणार नाही हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे.

BCCI Central Contract Rohit Sharma A Plus Grade : बीसीसीआयने अखेर केंद्रीय करार जाहीर केला. याची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहिली जात होती, पण उशिरा का होईना, आता ही घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, बीसीसीआयने पुन्हा चार भारतीय खेळाडूंना ए प्लस ग्रेडमध्ये स्थान दिले आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांची नावे आहेत. बीसीसीआयच्या या घोषणेनंतर, आता हे निश्चित झाले आहे की रोहित शर्मा सध्या कुठेही जाणार नाही.
गेल्या वर्षी जेव्हा भारतीय क्रिकेट संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता, तेव्हा रोहित शर्मा त्याच्या फॉर्मशी संघर्ष करत असल्याचे दिसून आले. त्या मालिकेत संघाची कामगिरीही फारशी खास नव्हती. परिस्थिती इतकी टोकाला पोहोचली होती की रोहित शर्माला शेवटच्या कसोटीच्या अंतिम अकरामधून स्वतःला वगळावे लागले.
यानंतर, रोहित शर्मा आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची अटकळ सुरू झाली. त्याने आधीच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पण आता बीसीसीआयने केलेल्या घोषणेवरून असे वाटत नाही की रोहित शर्मा कुठेही जात आहे.
जूनमध्ये जेव्हा टीम इंडिया पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडला जाईल, तेव्हा रोहित शर्मा संघाचे नेतृत्वही करताना दिसु शकतो. मात्र, अद्याप संघाची घोषणा झालेली नाही.
असे बोलले जाते की केंद्रीय कराराची घोषणा करण्यापूर्वी बीसीसीआयच्या उच्च अधिकाऱ्यांनी रोहित शर्माशी चर्चा केली असले आणि त्याच्या भविष्यातील योजना जाणून घेतल्या असतील. त्यानंतरच त्याला ए प्लस ग्रेड देण्यात आला. जर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा विचार करत असता, तर त्याला किमान A+ ग्रेड मध्ये जागी मिळाली नसती.
रोहित एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळणार
रोहित शर्मा किती काळ कसोटी खेळेल हे माहित नाही, परंतु त्याला 2027 मध्ये होणारा एकदिवसीय वर्ल्ड कप नक्कीच खेळायचा आहे. कारण त्याने आधीच सांगितले आहे की, त्याच्यासाठी खरा वर्ल्ड कप हा एकदिवसीय वर्ल्ड कप आहे, जो त्याला जिंकायचा आहे.
रोहितने आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे, तो फक्त दोन महिने आयपीएल खेळतो. आता त्याचे लक्ष फक्त एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांवर असणार आहे. पण, सध्या रोहितचा फॉर्म तसा नाही ज्यासाठी तो ओळखला जातो. अशा परिस्थितीत, इंग्लंड मालिकेदरम्यान तो कशी कामगिरी करतो हे पाहण्यासाठी त्याच्यावर निश्चितच लक्ष ठेवले जाईल.





















