BCCI VS BCB : मुस्तफिजूरच्या वादानंतर बांगलादेश इरेला पेटला; पाकिस्तानचा फॉर्म्युला उचलत जाणार ICCच्या दारात, टी-20 वर्ल्डकपच्या टाईमटेबलमध्ये मोठे बदल होणार?
Bangladesh T20 World Cup 2026 News : मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढल्यानंतर आता त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उमटताना दिसत आहेत.

Bangladesh Wants its T20 World Cup Games Out of India : मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढल्यानंतर आता त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उमटताना दिसत आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून (BCB) यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची चिन्हे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्ड लवकरच आयसीसीला ई-मेल पाठवून टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील आपल्या सामन्यांचे वेन्यू बदलण्याची मागणी करणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात बांगलादेश क्रिकेट बोर्डने थेट पाकिस्तानचीच वाट धरली आहे. भारतात सामने खेळण्याऐवजी श्रीलंकेत सामने आयोजित करण्याची बांगलादेश क्रिकेट बोर्डाची इच्छा असल्याचे सांगितले जात आहे.
बीसीसीआयच्या निर्णयावर BCB ची प्रतिक्रिया
रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशच्या क्रीडामंत्र्यांनी BCB ला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, त्यांनी ICC कडे अर्ज करून टी-20 वर्ल्ड कपमधील भारतातील सामने श्रीलंकेत हलवण्याची विनंती करावी. या निर्णयामागे मुख्य कारण मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढण्यात आलेला मुद्दा आहेच, पण त्याशिवाय ऑगस्टमध्ये होणाऱ्या भारताच्या व्हाइट-बॉल दौऱ्यावर बीसीसीआयकडून लावण्यात आलेली बंदी हेही मोठे कारण मानले जात आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या या निर्णयांनंतर आपली पुढील भूमिका ठरवण्यासाठी BCB ने 3 जानेवारी रोजी तातडीची (इमरजन्सी) बैठक बोलावली होती.
टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील बांगलादेशचे नियोजित सामने
टी-20 वर्ल्ड कप 2026 चे आयोजन 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत होणार आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार बांगलादेशचे चार सामने भारतात होणार आहेत. यापैकी तीन सामने कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर, तर एक सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. बांगलादेशचा पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडीजविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 9 फेब्रुवारीला इटलीविरुद्ध आणि 14 फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध सामना आहे. हे तिन्ही सामने ईडन गार्डन्सवरच नियोजित आहेत. चौथा आणि अंतिम ग्रुप सामना 17 फेब्रुवारी रोजी नेपाळविरुद्ध, मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळला जाणार आहे.
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल टाकत बांगलादेश?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध दीर्घकाळापासून तणावपूर्ण राहिले आहेत आणि त्याचा थेट परिणाम क्रिकेट संबंधांवरही झाला आहे. याच राजकीय तणावामुळे पाकिस्तान आपले टी-20 वर्ल्ड कप 2026 चे सामने श्रीलंकेत खेळत आहे. आता भारत-बांगलादेश संबंधांमध्येही तशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डने मांडलेल्या वेन्यू बदलाच्या मागणीवर आयसीसी काय निर्णय घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हे ही वाचा -





















