(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND VS BAN : ग्वाल्हेर सामन्यापूर्वी बांगलादेशी संघात भीतीचे वातावरण; जुम्मा नमाज मशिदीऐवजी 'या' जागेवर केला पठण
India vs Bangladesh T20 Series : भारत आणि बांगलादेश यांच्यात 6 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा थरार रंगणार आहे.
IND VS BAN Gwalior 1st t20 Match : भारत आणि बांगलादेश यांच्यात 6 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना ग्वाल्हेरच्या न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मात्र ग्वाल्हेरमध्ये बांगलादेशी संघाचा विरोध होत आहे. ऑगस्टमध्ये शेख हसीना सरकार पडल्यानंतर बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या कथित अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू महासभेने सामन्याच्या दिवशी ग्वाल्हेर बंदची घोषणा केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
ग्वाल्हेरमध्ये भारतासोबतच्या टी-20 सामन्यापूर्वी बांगलादेशचा क्रिकेट संघ शहरातील मोती मशिदीत शुक्रवारच्या नमाजासाठी गेला नव्हता. त्याऐवजी त्याने आपल्या हॉटेलमध्येच नमाज अदा केली. एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “आम्ही मोती मशिदीभोवती सुरक्षा व्यवस्था केली होती, परंतु बांगलादेशचा संघ आला नाही.
बांगलादेशी संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे, त्या हॉटेलपासून शहरातील फुलबाग परिसरातील मशीद 3 किमी अंतरावर आहे. ते म्हणाले की, 'मशिदीत नमाज अदा न करण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाच्या पातळीवर घेतला गेला असावा.
अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी मशिदीच्या बाहेर विस्तृत सुरक्षा व्यवस्था केली होती, जिथे अनेक मीडिया कर्मचारी देखील बांगलादेश संघाची वाट पाहत होते. हॉटेल आणि माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियममधील अंतर सुमारे 23 किमी आहे, जिथे बांगलादेश संघ 3 ऑक्टोबरपासून सराव करत आहे,
अधिकाऱ्याने सांगितले की, 'रविवारी ग्वाल्हेरमध्ये होणाऱ्या भारत-बांगलादेश टी-20 सामन्यासाठी 2,500 हून अधिक पोलीस कर्मचारी आधीच तैनात करण्यात आले आहेत. रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून पोलिस रस्त्यावर उतरणार आहेत. खेळ संपल्यानंतर, चाहते घरी पोहोचेपर्यंत ते कर्तव्यावर राहतील.
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.
टी-20 मालिकेसाठी बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), लिटन दास, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, तंजीद हसन, परवेज होसैन इमोन, तॉहीद हृदॉय, झाकेर अली, महेदी हसन, रिशाद होसैन, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब, रकीबुल हसन आणि महमुदुल्लाह.
हे ही वाचा -