(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 World Cup Winners : फायनलमध्ये 19 धावांनी ऑस्ट्रेलियाचा विजय, सहाव्यांदा कोरलं विश्वचषकावर नाव
AUSW vs SAW: महिला टी20 वर्ल्ड कप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 157 धावांचे टार्गेट दिल्यावर 137 धावांत रोखत ऑस्ट्रेलियन महिलांनी सहाव्यांदा विश्चषकाची ट्रॉफी जिंकली आहे.
SA vs AUS, WT20 Final : महिला T20 विश्वचषक (Womens T20 WC) 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 19 धावांनी मात देत ऑस्ट्रेलियन महिलांनी विश्वचषक मिळवला आहे. विशेष म्हणजे सहाव्यांदा विश्चषकावर ऑस्ट्रेलियन महिलांनी नाव कोरलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर पार पडलेल्या सामन्यात आधी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने अनुभवी बेथ मूनी हिच्या नाबाद 74 धावांच्या जोरावर 157 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले. दक्षिण आफ्रिकेकडून लॉरा वोल्वार्ड हिने 61 धावांनी एकहाती झुंज दिली. पण तिला इतर खेळाडूंची साथ न मिळाल्याने अखेर 137 धावाच दक्षिण आफ्रिकेचा संघ करु शकला. ज्यामुळे 19 धावांनी ऑस्ट्रेलियाने सामना आणि विश्वचषक जिंकला.
Australia complete the second hat-trick of ICC Women's #T20WorldCup titles 🔥
— ICC (@ICC) February 26, 2023
WHAT A TEAM!#AUSvSA | #TurnItUp pic.twitter.com/wZTePUmRSr
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियन महिलांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सेमीफायनलप्रमाणे एक दमदार लक्ष्य प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवायचं त्यांचं लक्ष्य होतं. ज्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चांगली गोलंदाजी केली, पण ऑस्ट्रेलियाची अनुभवी फलंदाज बेथ मूनी हिने एकहाती झुंज देत नाबाद 74 धावा केल्या. एलिल हेलीने 18 तर गार्डनरने 29 धावा केल्या. पण बेथ मूनी अखेरपर्यंत क्रिजवर टिकून राहिल्याने ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 150 पार पोहोचली. कागांरुनी 156 धावा स्कोरबोर्डवर लावत 157 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेला दिले.
लॉरा वोल्वार्डची झुंज अपयशी
विजयासाठी 120 चेंडूत 157 धावा करायच्या असताना आजही दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या सर्वाधिक आशा त्यांच्या सलामीवीरांकडून होत्या. कारण दक्षिण आफ्रिकेची सलामीची जोडी महिला टी-20 विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक यशस्वी ठरली होती. त्यामुळे अंतिम सामन्यात हीच जोडी ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढवू शकत होती.. लॉरा वोल्वार्ड आणि ताजमिन ब्रिट्स ही सलामीची जोडी महिला टी20 विश्वचषकात आतापर्यंतची सर्वात यशस्वी जोडी ठरली होती. त्यांनी यंदाच्या T20 विश्वचषकात डावाची सुरुवात करताना सर्वाधिक 299 धावा केल्या होत्या. पण आज मात्र ताजमिन ब्रिट्स 10 धावा करुन बाद झाली. दुसरीकडे लॉरा वोल्वार्ड हिने एक चांगली झुंज दिली. पण 61 धावाच ती करु शकली आणि संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकली नाही. क्लोई ट्रॉयनने 25 धावांची खेळी केली, पण अखेर 20 षटकांत 137 धावाच दक्षिण आफ्रिकेचा संघ करु शकला. ज्यामुळे 19 धावांनी ऑस्ट्रेलियाने सामना आणि विश्वचषक जिंकला.