ऑस्ट्रेलियाचा 367 धावांचा डोंगर, वॉर्नर-मार्शची वादळी शतके, शाहीन आफ्रिदीमुळे पाकिस्तानची लाज वाचली
World Cup 2023 : डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभारला.
AUS vs PAK, World Cup 2023 : डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकात 9 विकेट्सच्या मोबद्लयात 367 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी बेंगळुरुमध्ये 19 षटकार मारले. शाहीन शाह आफ्रिदीने पाच विकेट घेत पाकिस्तानला सामन्यात परत आणले.
डेविड वॉर्नरचे वादळ -
मागील तीन सामन्यात मोठी खेळी करु न शकणाऱ्या वॉर्नरने आज पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतला. डेविड वॉर्नर याने पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढली. डेविड वॉर्नरने 124 चेंडूत 163 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये 9 षटकार आणि 14 चौकार लगवाले आहेत. डेविड वॉर्नर याने एकापाठोपाठ एक चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्यात पाकिस्तानची खराब फिल्डिंगनेही मदत केली. पाकिस्तानच्या खेळाडूंनी वॉर्नरचे दोन झेल सोडले. डेविड वॉर्नरपुढे पाकिस्तानच्या गोलंदाजांनी लोटांगण घातले होते.
मिचेल मार्शचे झंझावती शतक -
ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज मिचेल मार्श यानेही पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढली. मार्श याने पहिल्या चेंडूपासूनच पाकिस्तानच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. त्यात पाकिस्तानच्या खराब फिल्डिंगनेही मदत केली. मार्श याने 9 षटकार आणि 10 चौकारांचा पाऊस पाडला. मिचेल मार्श याने 108 चेंडूत 121 धावांची खेळी केली. मिचेल मार्श याने डेविड वॉर्नर याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 33.5 षटकात 259 धावांची भागीदारी केली.
ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढेपाळली -
मिचेल मार्श आणि डेविड वॉर्नर यांच्या आक्रमक शतकी खेळीनंतर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढेपाळली. एकाही फलंदाजाला तीस धावसंख्याही ओळांडता आली नाही. ग्लेन मॅक्सवेल शून्य धावसंख्येवर माघारी परतला. तर अनुभवी स्मिथला फक्त सात धावांचे योगदान देता आले. आक्रमक मार्कस स्टॉयनिस फक्त 21 धावा करु शकला. स्टॉयनिसने एका धावेसाठी 24 चेंडू खर्च केला. यामध्ये एक चौकार आणि एक षटकार ठोकले. जोश इंग्लिंश याने संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही 9 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 13 धावा करता आल्या. मार्नस लाबुशेन आठ धावा काढून बाद झाला. मिचेल स्टार्क फक्त दोन धावा काढून बाद झाला. जोश हेजलवूडला खातेही उघडता आले नाही.
शाहीनचा भेदक मारा -
एकीकडे पाकिस्तानच्या गोलंदाजांचा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी समाचार घेतला. त्याचवेळी शाहीन आफ्रिदीने भेदक मारा केला. शाहीन आफ्रिदीच्या भेदक माऱ्यामुळे या सामन्यात पाकिस्तानने कमबॅक केले. शाहीन आफ्रिदीने ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना बाद केले. शाहीन शाह आफ्रिदीने 10 षटकात 54 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या. आफ्रिदीने एक षटक निर्धावही फेकले.
हॅरीस रौफ आणि शाहीन आफ्रिदी यांनी पाकिस्तानसाठी कमबॅक केले. हॅरीस रौफ महागडा ठरला पण तीन विकेट घेतल्या. हॅरीस रौफ याने आठ षटकात तब्बल 83 धावा खर्च केल्या. हॅरीस रौफ याने तीन विकेट घेतल्या. हॅरी रौफ याने जोश इंग्लिश, मार्नस लाबुशेन आणि डेविड वॉर्नर यांना तंबूत धाडले. उसामा मीर याने 9 षटकात 82 धावा खर्च केल्या. त्याला फक्त एक विकेट घेता आली.