Asia Cup Trophy Mohsin Naqvi Ind vs Pak: आशिया चषक स्पर्धेच्या (Ind vs Pak Asia Cup Final) 28 सप्टेंबर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. मात्र या सामन्यानंतर दुबईतील मैदानात ट्रॉफीवरुन जोरदार राडा झाला. आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वीच्या  (Mohsin Naqvi) हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास भारतीय संघानं स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन मैदानाच्या बाहेर निघून गेले. अंतिम सामना जिंकल्यानंतरही भारतीय संघाला अद्याप ट्रॉफी मिळालेली नाही. याचदरम्यान, काल (30 सप्टेंबर) आशियाई क्रिकेट कौन्सिलची दुबईत बैठक झाली. या बैठकीसाठी बीसीसीआयकडून राजीव शुक्ला (Rajeev Shukla) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी राजीव शुक्ला यांनी मोहसीन नक्वीला ट्रॉफीबाबत जाब विचारला. दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला, जाणून घ्या....

Continues below advertisement


बैठकीत राजीव शुक्ला आणि मोहसीन नक्वी यांच्यातील संवाद- (Rajeev Shukla On Mohsin Naqvi)


राजीव शुक्ला-  ही ट्रॉफी आमची आहे, तुम्ही ती कशी ठेवू शकता? आणि ती आशियाई क्रिकेट परिषदेला का सादर केली जात नाही?


मोहसीन नक्वी- मला अनधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले की, जर भारत जिंकला तर संघ माझ्याकडून ट्रॉफी घेईल. जर मला माहित असते की असे होणार नाही, तर मी येथे आलो नसतो.


राजीव शुक्ला- तुमचे कोणते अनधिकृत सूत्र? तुम्ही आम्हाला विचारायला हवे होते. सुरुवातीपासूनच आमची भूमिका स्पष्ट आहे. भारतीय संघ तुमच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही.


मोहसीन नक्वी- मी याबद्दल तुमच्याशी स्वतंत्रपणे बोलेन जेणेकरून आम्हाला तोडगा काढता येईल.


मोहसीन नक्वीवर प्रश्नांची सरबत्ती- ( ACC Meeting)


आशिया चषकाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात झालेल्या गोंधळाप्रकरणी आणि विजेतेपदाची ट्रॉफी भारतीय संघाला सन्मानानं मिळण्याबाबत योग्य उत्तर आणि आश्वासन न मिळाल्यानं बीसीसीआयचे प्रतिनिधी आशिष शेलार आणि राजीव शुक्ला यांनी आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीतून सभात्याग केला. दुबईमधल्या या बैठकीसाठी बीसीसीआय प्रतिनिधी आशिष शेलार आणि राजीव शुक्ला यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. आशिष शेलार आणि राजीव शुक्ला या दोघांनीही आशिया चषकाच्या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या वेळी घडल्या प्रकाराबाबत एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वीवर प्रश्नांची सरबत्ती केली, अशी सूत्रांची माहिती आहे. 


आशिष शेलारही मोहसीन नक्वीवर संतापले- (Ashish Shelar In ACC Meeting)


मोहसीन नक्वीने आपल्या अध्यक्षीय भाषणात आशिया चषक विजेत्या भारतीय संघाचं अभिनंदन करण्याचं टाळलं. त्यावरही आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला आणि मोहसीन नक्वीला त्याबद्दल जाबही विचारला. त्यानंतरच नक्वीने भारतीय संघाचं आशिया चषक विजयाबद्दल अभिनंदन केलं, अशी माहिती एसीसीतल्या सूत्रांनी दिली आहे.


संबंधित बातमी:


Ind Vs Pak Asia Cup: मॅच संपल्यावर आम्ही दीड तास ताटकळत, ट्रॉफी घ्यायला जाणार इतक्यात ते लोक.... सूर्यकुमार यादवने सांगितली दुबईच्या मैदानातील Inside Story


भारतीय संघाला आशिया कपची ट्रॉफी मिळणार की नाही?; आयसीसीचा नियम काय सांगतो?, A टू Z माहिती