इस्लामाबाद : आशिया चषकातील (Asia Cup 2025) पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेट संघावर (Pakistan Cricket Team) त्यांच्याच देशात सर्वाधिक टीका होत आहे. त्यातच टी 20 संघातून माजी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांना वगळल्यामुळेही पाकिस्तानवर (Pakistan) टीका झाली होती. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) मोठा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (Pakistan vs South Africa Test) होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानने संघ जाहीर केला आहे. यामध्ये बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांचाही संघात समावेश केला आहे. कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानी संघाचं नेतृत्व शान मसूद करत आहे.
पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने 18 जणांचा कसोटी संघ जाहीर केला आहे. येत्या 12 ऑक्टोबरपासून पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिकाही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप 2025-27 चा (ICC World Test Championship 2025-2027) भाग आहे.
बाबर आझम आणि रिझवानचं पुनरागमन (Babar Azam & Mohammad Rizwan)
आशिया चषकात धूळदाण झालेल्या पाकिस्तानी संघाने आता कसोटी संघ निवडताना सावध पावलं उचलली आहेत. यावेळी त्यांचे कथित हुकुमी फलंदाज माजी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना स्थान देण्यात आलं आहे. कर्णधार शान मसूदच्या नेतृत्वात आता हे दोन्ही अनुभवी खेळाडू कसोटी मालिका खेळणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे, या कसोटी मालिकेत विकेटकीपर फलंदाज म्हणून मोहम्मद रिझवानवर मोठी जबाबदारी असेल. तर बाबर आझमच्या पुनरागमनामुळे पाकिस्तानी संघाची मधली फळी मजबूत झाली आहे.
गोलंदाजीची धुरा कुणाकडे? (Pakistan Bowlers)
पाकिस्तानच्या 18 जणांच्या कसोटी संघात शाहीन आफ्रिदी हा गोलंदाजीचं नेतृत्व करणार आहे. त्याला हसन अलीची साथ असेल. दुसरीकडे अबरार अहमद फिरकीची धुरा सांभाळणार आहे.
3 नव्या चेहऱ्यांना संधी
पाकिस्तानी क्रिकेट संघाने तीन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे, त्यामध्ये डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज आसिफ अफरीदी, दुसरा फिरकी गोलंदाज फैसल अक्रम आणि यष्टीरक्षक फलंदाज रोहेल नजीरसाठी ही पदार्पणाची संधी असणार आहे. पाकिस्तानी खेळाडूंचे हेड कोच अजहर महमूद आणि एनसीएच्या प्रशिक्षक मार्गदर्शन कार्यक्रमात 8 ऑक्टोबर रोजी ट्रेनिंग कॅम्पमध्ये सहभाग घेणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एसीसी पुरुष टी20 एशिया चषक स्पर्धेत भाग घेतलेले क्रिकेटर 4 अक्टूबर रोजीच्या कँपमध्ये सहभागी होणार आहेत.
पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रीकेचा संघ 12 ते 16 अक्टूबरदरम्यान लाहौरमधील गद्दाफी स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळणार आहे, त्यानंतर 20 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये दुसरा कसोटी सामना खेळला जाईल. दोन्ही देश 28 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या काळात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहेत. तर, 4 ते 8 ऑक्टोबरमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळली जाईल. अद्याप टी-20 आणि वनडे सीरीजसाठी संघाची घोषणा झालेली नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानचा संघ
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ : शान मसूद (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्लाह शफीक, अबरार अहमद, आसिफ अफरीदी, बाबर आजम, फैसल अकरम, हसन अली, इमाम-उल-हक, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक), नोमान अली, रोहेल नजीर (यष्टीरक्षक), साजिद खान, सलमान अली आगा, सऊद शकील और शाहीन शाह अफरीदी.