Ind Vs Pak Asia Cup Suryakumar Yadav: आशिया चषक स्पर्धेत रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा पराभव केला. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध ताणले गेल्यामुळे संपूर्ण आशिया चषक स्पर्धेत नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. भारत आणि पाकिस्तान (Ind Vs Pak Final) यांच्यातील अंतिम सामना संपल्यानंतर घडलेल्या गोष्टींची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. भारतीय संघाने पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्याकडून आशिया चषक स्वीकारायला नकार दिला, असे सांगितले जात होते. त्यामुळे भारतीय संघ दुबईतून निघेपर्यंत त्यांना आशिया चषक मिळालाच नव्हता. या सगळ्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. आम्ही आशिया कप घ्यायला नकार दिला नाही. आम्ही व्यासपीठाच्या खाली उभे असताना अचानक काही लोक मेडल आणि ट्रॉफी घेऊन वेगळ्या बाजूला निघून गेले, असे सूर्यकुमार यादव याने सांगितले. सूर्यकुमार यादवचा अप्रत्यक्ष रोख पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडे होता. सूर्यकुमार यादव याचे सोमवारी रात्री मुंबईत आगमन झाले. त्यानंतर त्याने एबीपी माझाशी खास संवाद साधला. यावेळी त्याने भारत-पाकिस्तान फायनलनंतर दुबईच्या मैदानात नेमके काय घडले होते, हे सांगितले.

Continues below advertisement


सामना संपल्यानंतर आम्ही मैदानात एक-दीड तास उभे होतो. आमचे फोन आमच्या हातात होते, आम्ही फोटो काढण्यासाठी तयार होतो. पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर शिवम दुबे गेला, तिलक वर्मा व्यासपीठावर गेला. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव यांनीही त्यांची पारितोषिके स्वीकारली. यानंतर आम्ही आशिया कप मिळेल, या आशेने वाट बघत होतो. मात्र, त्यावेळी अचानक व्यासपीठावरील लोक मेडल आणि ट्रॉफी घेऊन वेगळ्या बाजूला गेले. आम्ही ट्रॉफी स्वीकारायला नकार दिला नाही, असे सूर्यकुमार यादव याने स्पष्ट केले. आशिया चषक आम्हीच जिंकला आहे. ती ट्रॉफी आमचची आहे, ती आम्हाला नक्की मिळेल, असा विश्वासही सूर्यकुमार यादवने व्यक्त केला.


Team India: भारत-पाकिस्तान तणावामुळे आमच्यावर प्रेशर आलं होतं, मग ड्रेसिंग रुममध्ये बसून... सूर्यकुमार यादवने काय सांगितलं?


पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय संघातील खेळाडूही भावनिक झाले होते. आधी आम्हाला सांगण्यात आलं होतं की, आशिया चषक स्पर्धा होणार नाही. मग स्पर्धा होणार निश्चित झाल्यावर आम्ही दुबईला गेलो. आम्ही तिकडे पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळलो. तेव्हाच आम्ही ठरवले की, पाकिस्तानी खेळाडुंशी हस्तांदोलन करायचे नाही. आम्ही फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले. पण सुपर फोर आणि अंतिम सामन्यात पाकिस्तानी संघ काहीतरी करणार, हे आम्हाला माहिती होतं. त्यामुळे आमचे लक्ष विचलित झाले होते. 


मग आम्ही सगळ्या खेळाडुंनी एकत्र बसून पुन्हा क्रिकेटवरच फोकस कसा राहील, याबाबत चर्चा केली. पहिला सामना हरल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू वैफल्यग्रस्त झाले होते. हारिस रौफ त्यामुळेच मैदानात काहीतरी बोलला. पाकिस्तानी खेळाडू मैदानात वेगळंच काही बोलत होते. त्याला आम्ही चांगले क्रिकेट खेळून प्रत्युत्तर दिले, असे सूर्यकुमार यादव याने सांगितले.



आणखी वाचा


भारतीय संघाला आशिया कपची ट्रॉफी मिळणार की नाही?; आयसीसीचा नियम काय सांगतो?, A टू Z माहिती