Asia Cup 2023 : 8 वेळा 'आशिया' जिंकली, सर्वाधिक चेंडू राखून विजय, पॉवर प्लेमध्येही विक्रम, भारताचा रेकॉर्डचा पाऊस
IND vs SL, Asia Cup 2023 : भारताने श्रीलंकेविरुद्धचा सामन्यात दणदणीत विजय मिळवून आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं आहे. या सामन्यात टीम इंडियेन अनेक विक्रम रचले आहेत.
कोलंबो : भारतीय संघाच्या (India vs Sri Lanka) गोलंदाजांनी आशिया चषक 2023 मध्ये विजय मिळवून दिला. टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजीच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेच्या गोलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडलं. श्रीलंका संघाला भारतीय संघाने 50 धावांवर आलआऊट केलं. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचा डाव पत्त्यांसारखा कोसळला. श्रीलंकेनं आशिया कपमध्ये सर्वात कमी धावांचा नकोसा विक्रम रचला. तर भारताने 24 वर्षांपूर्वीच्या पराभवाचा वचपा काढला. या सामन्यात भारताने अनेक विक्रम रचले आहेत. हे विक्रम कोणते याबाबत सविस्तर जाणून घ्या.
श्रीलंकेचा लाजिरवाणा पराभव
श्रीलंका संघाचा कर्णधार दसून शनाका (Dasun Shanaka) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी उलटून लावला. श्रीलंका संघ अवघ्या 15.2 षटकात फक्त 50 धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेकडून फक्त कुसल मेंडिस याने सर्वाधिक 17 धावा केल्या. हेमंथाने नाबाद 13 धावा केल्या. श्रीलंकेचे पाच फलंदाज शून्यावर बाद झाले. मेंडिस आणि हेमंथा या दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या करता आली नाही. कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, दसून शनाका आणि मथीशा पथिराना शून्यावर तंबूत परतले.
भारत आठव्यांदा आशिया चषक विजेता
भारताने आशिया कप 2023 जिंकून एकूण आठ वेळा या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. भारताने 1984 मध्ये पहिल्यांदा आशिया कप जिंकला. 1984 मध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव केला होता. त्यानंतर 1988, 1991, 1995, 2010, 2016, 2018 साली आशिया कप जिंकला. त्यानंतर आता आठव्यांदा टीम इंडियानं आशिया चषक पटकावलं आहे.
अंतिम सामन्यात 6 वेळा श्रीलंकेचा पराभव
आशिया कप स्पर्धेमध्ये टीम इंडियाने सहा वेळा श्रीलंकेचा अंतिम सामन्यात पराभव केला आहे. 1984 मध्ये श्रीलंकेला हरवून भारताने पहिल्यांदा आशिया कपवर नाव कोरलं. त्यानंतर 1988, 1991, 1995, 2010 आणि 2023 मध्ये आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव केला.
श्रीलंकेच्या नावावर लाजीरवाणा विक्रम
आशिया कपमध्ये (Asia Cup Final) सर्वात कमी धावसंख्येचा लाजीरवाणा विक्रम श्रीलंकेच्या (Sri Lanka) नावावर आहे. श्रीलंका संघाचा डाव 50 धावांवर आटोपला. याआधी आशिया कपमध्ये सर्वात कमी धावांचा विक्रम बांगलादेशच्या नावावर होता. बांगलादेश संघ 87 धावांवर ऑलआऊट झाला होता.
1999 मधील पराभवाचा वचपा काढला
अखेर 24 वर्षांनंतर भारताने वचपा काढला आहे. 1999 च्या कोको-कोला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेने भारताला अवघ्या 54 धावांवर बाद केलं होतं. 54 धावांवर टीम इंडियाचा संपूर्ण संघ तंबूत परतला होता. आता तब्बल 24 वर्षांनंतर भारताने वचपा काढत श्रीलंकेला 50 धावांवर सर्वबाद केलं
सर्वाधिक चेंडू राखून विजय
श्रीलंका संघाने 50 धावांचं लक्ष दिलं. प्रत्युत्तरात भारताने 6.1 षटकात 51 धावा करत विजय मिळवला. भारतानं एकदिवसीय सामन्यात सर्वाधित 263 चेंडू राखून विजय मिळवण्याचाही विक्रम केला आहे.