मध्यरात्री 1 वाजता फोन, बंगळुरूवरून पासपोर्ट घेण्यासाठी चेन्नईला गेला, तिथून थेट श्रीलंका गाठली, फायनलमध्ये केवळ दोन वेळाच धावला!
washington sundar : भारताने श्रीलंकेचा पराभव करत आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले.
washington sundar : भारताने श्रीलंकेचा पराभव करत आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीपुढे गतविजेत्या श्रीलंका संघाने गुडघे टेकले. एकाही फलंदाजाला वीस धावसंख्याही पार करता आली नाही. श्रीलंकेचा संपूर्ण संघ ५० धावांत तंबूत परतला होता. फायनल सामन्यासाठी टीम इंडियात अष्टपैलू खेळाडूला बोलवले होते. पण त्याला गोलंदाजी अन् फलंदाजीही करता आली नाही. फिल्डिंग करताना तो फक्त दोन वेळा चेंडू आडवण्यासाठी धावलाय. होय.. आम्ही सांगतोय वॉशिंगटन सुंदरबद्दल.... सामन्यानंतर वॉशिंगटन सुंदर याने श्रीलंकामध्ये पोहचण्याचा प्रवास सांगितला.
बांगलादेशविरोधात सुपर ४ च्या सामन्यात अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या. फायनलसाठी टीम इंडियाने युवा अष्टपैलू वॉशिंगटन सुंदर याला पाचारण केले होते. पण वॉशिंगटन सुंदर याला श्रीलंकेत पोहचण्यासाठी संघर्ष करावा लागला. भारताने आशिया चषक जिंकल्यानंतर स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या अँकरने प्रत्येक खेळाडूसोबत संवाद साधला. यावेळी वॉशिंगटन सुंदर यालाही प्रश्न विचारण्यात आले. टीम इंडियातून बोलवणं आल्याबद्दल सुदंर याला विचारले होते. त्यावर सुंदर म्हणाला की, मध्यरात्री १२ च्या आसपास मला टीम इंडियातून फोन आला. मी त्यावेळी बेंगळुरुमधील एनसीएमध्ये होते. तेथून मला तात्काळ चेन्नईसाठी रवाना व्हावे लागले. चेन्नईमधून पासपोर्ट घेऊन मी श्रीलंकेला रवाना झालो. अंतिम सामन्याच्या प्लेईंग ११ मध्ये मला स्थानही मिळाले. पण मैदानावर फिल्डिंग करताना फक्त दोन चेंडूच्या मागे धावलो असेल. ना गोलंदाजी केली ना फलंदाजी केली.
भारताने आशिया चषकावर नाव कोरल्यानंतर वॉशिंगटन सुंदर चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर वॉशिंगटन सुंदर याच्याबद्दल मिम्स व्हायरल होत आहेत.
एशियन गेम्ससाठी चीनला रवाना होणार सुंदर
टीम इंडियाने आशिया चषकावर नाव कोरले. आता वॉशिंगटन सुंदर थेट चीनला रवाना होणार आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात भारतीय संघ एशिय गेम्समध्ये सहभागी झाला आहे. या संघाचा सुंदर सदस्य आहे. पुढील आठवड्यात एशियन गेम्स सुरु होणार आहेत.
तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळतोय सुंदर -
२३ वर्षीय सुंदर भारतासाठ तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळतोय. सुंदरने चार कसोटी, १६ वनडे आणि ३७ टी२० सामने खेळले आहे. फलंदाजी करताना त्याने कसोटीमध्ये २६५, वनडेमध्ये २३३ आणि टी२० मध्ये १०७ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत कसोटीमध्ये सहा, वनडेमध्ये १६ आणि टी २० मध्ये २९ विकेट घेतल्या आहेत. सुंदरने डिसेंबर २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेय.