T20 WC NZ vs AFG: अफगाणिस्तानचा संघ न्यूझीलंडपेक्षा वरचढ, पाहा आकडे काय म्हणतात
NZ vs AFG : न्यूझीलंडसारख्या बलाढ्या संघाचा पराभव कऱणं अफगाणिस्तानसाठी सोपं नाही. जाणून घेऊयात भारताला उपांत्य फेरीत पोहचण्याची कितपत संधी आहे....
NZ vs AFG : टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी भारतीय संघाचं भवितव्य अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्यावर अवलूंबन आहे. आज, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या लढत होणार आहे. या लढतीकडे 130 कोटी भारतीय लक्ष ठेवून आहेत. जर अफगाणिस्तान संघानं न्यूझीलंड संघाचा पराभव केला तर भारतीय संघाची उपांत्य फेरीची आशा कायम राहणार आहे. अशात भारतीय क्रीडा चाहत्यांनी आपले देव पाण्यात ठेवले आहेत. पण न्यूझीलंडसारख्या बलाढ्या संघाचा पराभव कऱणं अफगाणिस्तानसाठी सोपं नाही. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानच्या कामगिरीवर नजर टाकूयात. अन् जाणून घेऊयात भारताला उपांत्य फेरीत पोहचण्याची कितपत संधी आहे....
टी-20 मध्ये पहिल्यांदाच आमने-सामने :
गेल्या अनेक वर्षांपासून आफगाणिस्तान संघाला आयसीसीची पूर्ण मान्यता मिळाली आहे. अफगाणिस्तान संघानं अनेक देशांसोबत सामने खेळले आहेत. पण, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड आतापर्यंत एकदाही टी-20 मध्ये आमने-सामने आले नाहीत. आज अबू धाबीमध्ये पहिल्यांच समोरासमोर येणार आहेत. पण दोन्ही संघाला या मैदानावर खेळण्याचा अनूभव आहे.
अफगाणिस्तानचं पारडं जड –
दोन्ही संघावर नजर मारल्यास न्यूझीलंड संघाचं पारडं जड मानलं जातेय. क्रीडा तज्ज्ञांकडूनही न्यूझीलंडला झूकत माप दिलं जातेय. मात्र, अबू धाबीच्या मैदानावर अफगाणिस्तानची कामगिरी अतुलनीय आहे. या मैदानावर अफगाणिस्तानचा संघ न्यूझीलंडपेक्षा वरचढ असल्याचं दिसतेय. अबू धाबीच्या मैदानावर अफगाणिस्तान संघानं 12 सामने खेळले आहेत. यापैकी 9 सामन्यात विजय संपादन केलाय. तर फक्त तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलेय. न्यूझीलंडनं या मैदानावर फक्त एक सामना खेळलाय. या सामन्यात त्यांना पाकिस्तानकडून पराभव स्विकारावा लागलाय.
विश्वचषकातील दोन्ही संघाची कामगिरी -
सध्या सुरु असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दोन्ही संघानं समाधानकारक कामगिरी केली आहे. भारताविरोधातील सामना वगळता अफगाणिस्तान संघानं प्रत्येक संघाला कडवं आव्हान दिलेय. पाकिस्तान संघाच्या नाकीनऊ आणलं होतं. अफगाणिस्तान चार गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा पराभव करत उपांत्य फेरीत पोहचण्याच्या आशा आहे. न्यूझीलंड संघ सहा गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
दोन्ही संघाचं तगडं आव्हान -
अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी उत्तम धावसंख्या उभारल्यास नंतर रशीद खानसह गोलंदाजांना कामगिरी उंचावावी लागेल. दुखापतीमुळे मुजीब ऊर रेहमानच्या अनुपस्थितीची उणीव अफगाणिस्तानला भासेल. संपूर्ण स्पर्धेत न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी सरासरी कामगिरी केली आहे. सलामी फलंदाजांवर न्यूझीलंडचा संघ अवलंबून असल्याचं या स्पर्धेत दिसलं आहे. मधल्या फळीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ग्लेन फ्लिप्स आणि निशम यांनी नामेबियाविरोधात संघाला सावरलं. पण केन विल्यमस्नचा फॉर्म न्यूझीलंडसाठी चिंतेचा विषय आहे.