गुजरात अन् मुंबईच्या सामन्यानंतर जय शाह यांनी इशान किशनसोबत केली दीर्घ चर्चा; कोणते संकेत?
Jay Shah Meets Ishan Kishan: बीसीसीआयने इशान किशन आणि श्रेयस अय्यर या अनुभवी खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धांमध्ये न खेळल्यामुळे बोर्डाच्या केंद्रीय करारातून वगळले होते.
Jay Shah Meets Ishan Kishan: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी रात्री गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल सामन्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी भारतीय संघाचा खेळाडू आणि मुंबईचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनची मैदानात भेट घेतली. त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याही दिसत आहे.
बीसीसीआयने इशान किशन आणि श्रेयस अय्यर या अनुभवी खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धांमध्ये न खेळल्यामुळे बोर्डाच्या केंद्रीय करारातून वगळले होते. इशानच्या या वृत्तीवर बीसीसीआय नाराज असल्याच्या बातम्याही आल्या होत्या, पण गुजरात आणि मुंबईच्या मॅचनंतर जय शाहने इशानची भेट घेतली आणि दोघांमध्ये चर्चा झाली. जय शाह इशानच्या खांद्यावर हात ठेवून हसत-हसत बोलत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.
Jay Shah having a word with Ishan Kishan. pic.twitter.com/IzkElZysHv
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 24, 2024
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार अन् वाद वाढला
बीसीसीआय आणि इशान यांच्यातील वाद वाढला जेव्हा यष्टीरक्षक फलंदाजाने वैयक्तिक कारण सांगून दक्षिण आफ्रिका दौरा अर्ध्यातच सोडला. रिपोर्टनुसार, इशानने सांगितले की, तो खूप दिवसांपासून संघासोबत प्रवास करत आहे. त्यामुळे तो थकला आहे आणि काही काळ विश्रांती घ्यायची आहे. मात्र, इशान भारतात परतला नाही आणि दुबईला गेला. यानंतर, त्याची अफगाणिस्तानविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेसाठी निवड झाली नाही किंवा इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड झाली नाही. भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडने राष्ट्रीय संघात परतण्यापूर्वी इशानला रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याचा सल्ला दिला होता, मात्र ईशानने तसे केले नाही आणि आयपीएलची तयारी सुरू केली.
देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळणे बंधनकारक
बीसीसीआयने केंद्रीय करारामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व खेळाडूंना आपापल्या स्थानिक संघांसाठी खेळणे बंधनकारक केले होते. पण ईशानने हे केले नाही. श्रेयस अय्यरने पाठदुखीचे कारण देत रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीतून माघार घेतली होती. मात्र, नॅशनल क्रिकेट अकादमीचे (एनसीए) क्रीडा शास्त्राचे प्रमुख नितीन पटेल यांनी श्रेयसच्या दुखापतीचा इन्कार केला होता. यानंतर बीसीसीआयने इशान आणि श्रेयसला केंद्रीय करारातून वगळले होते.
पहिल्या सामन्यात इशानची बॅट चालली नाही
प्रदीर्घ कालावधीनंतर मैदानात परतणारा इशान किशन आयपीएल 2024 च्या मोसमातील गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात फ्लॉप ठरला. या सामन्यात तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला आणि आयपीएलच्या 17व्या हंगामात त्याची सुरुवात चांगली झाली नाही. विशेष म्हणजे याच्या एक दिवस आधी शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरही शून्यावर बाद झाला होता. श्रेयस केकेआरचा कर्णधार आहे.