PAK vs AFG Tri Series 4th T20I : आशिया कपपूर्वी पाकिस्तानची पोलखोल; अफगाण पठाणांसमोर पाक खेळाडू लाचार, पॉइंट्स टेबलमध्येही झटका
Afghanistan beat Pakistan : मंगळवारी शारजाहमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा 18 धावांनी पराभव करून मागील पराभवाचा बदला घेतला.

Afghanistan beat Pakistan by 18 runs : मंगळवारी शारजाहमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा 18 धावांनी पराभव करून मागील पराभवाचा बदला घेतला. युएई ट्राय-नेशन मालिकेतील चौथ्या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर 170 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र पाकिस्तानची सलमान अली आगा यांच्या नेतृत्वाखालील टीम 20 षटकांत 151 धावांपर्यंतच मजल मारू शकली. या पराभवानंतर पाकिस्तानला स्पर्धेत पहिलाच धक्का बसला असून गुणतालिकेत त्यांची घसरण झाली आहे.
170 धावांच्या पाठलागात पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर पॉवरप्लेमध्येच बाद झाले. साहिबजादा फरहान 18 धावांवर माघारी परतला, तर सईम अयूब खातेही न उघडता बाद झाला. दोघांनाही फजलहक फारूकने माघारी धाडले. फखर जमनला मोहम्मद नबीने 18 चेंडूत 25 धावांवर रोखले, तर कर्णधार सलमान अली आगा 20 धावांवर रनआऊट झाले.
शेवटी हारिस रऊफने थोडा झुंजारपणा दाखवला. त्याने अवघ्या 16 चेंडूत 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 34 धावा केल्या. पण त्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले. अखेर अफगाणिस्तानने सामना 18 धावांनी जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.
पाकिस्तानला पॉइंट्स टेबलमध्येही झटका
यूएई ट्राय-सीरीज 2025 मधील पाकिस्तानची ही पहिली हार ठरली असून, गुणतालिकेत ते अव्वल स्थानावरून दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांनी तीन-तीन सामने खेळले असून त्यापैकी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्हींचे समान चार-चार गुण आहेत. मात्र नेट रनरेटच्या आधारे अफगाणिस्तान वरचढ ठरला आहे. अफगाणिस्तानचा नेट रनरेट +1.400 आहे, तर पाकिस्तानचा केवळ +0.325 आहे.
तिसऱ्या क्रमांकावर यूएईचा संघ आहे, ज्याने आपले दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे फायनलची संधी जिवंत ठेवायची असेल तर यूएईला पुढील दोन्ही सामने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानविरुद्ध जिंकावे लागणार आहेत, पण ते आव्हान कठीण आहे. यूएईचा सामना पाकिस्तानशी गुरुवारी, तर अफगाणिस्तानशी शुक्रवारी होणार आहे. त्यानंतर 7 सप्टेंबर रोजी गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे.
इब्राहिम जादरान ठरला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू
शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राशिद खानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच षटकात अफगाणिस्तानला रहमानुल्लाह गुरबाजच्या रूपाने पहिला धक्का बसला, तेव्हा संघाचा स्कोर फक्त 10 धावा होता. त्यानंतर सेदिकुल्लाह अटल आणि इब्राहिम जादरान यांनी शतकी भागीदारी रचली.
अटलने 45 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 64 धावा झळकावल्या. तर इब्राहिम जादरानने 45 चेंडूत 144.44 च्या स्ट्राईक रेटने 65 धावा केल्या. त्याच्या खेळीत 1 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. या दमदार खेळीमुळे त्याला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला.
हे ही वाचा -




















