तिसरा दिवसही रद्द! 'पैसे कमावण्यासाठी नोएडामध्ये मॅच...’ अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटीत धक्कादायक खुलासा
अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय पथिक क्रीडा संकुलात खेळवला जाणार आहे.
Afghanistan vs New Zealand Test Day-3 Called Off : अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय पथिक क्रीडा संकुलात खेळवला जाणार आहे. मात्र, आज खेळाचा तिसरा दिवस असून अद्याप नाणेफेक पण झालेली नाही. पावसामुळे अधिकाऱ्यांनी तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द केला आहे.
ग्रेटर नोएडाच्या शहीद विजय पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधून नवीन फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये हे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की मुसळधार पाऊस असल्याने मैदानावर पाणी साचले आहे. तर याआधी 2 दिवसही सामना होऊ शकला नाही, कारण 9 आणि 10 सप्टेंबर रोजी ग्रेटर नोएडा स्टेडियमचे आऊटफील्ड ओले होते. या कारणास्तव अद्याप सामना सुरू झालेला नाही.
आता या सामन्याशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या प्रकरणाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, हे स्टेडियम ग्रेटर नोएडा प्राधिकरणाच्या अंतर्गत येते. इथले काही लोक आणि अफगाणिस्तान क्रिकेटमधील काही लोकांनी मिळून पैसे कमावण्यासाठी इथे सामना आयोजित केला.
सूत्राने पुढे सांगितले की, उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने अनेकदा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाशी बैठकीची मागणी केली होती. तुम्हाला जे हवे आहे ते आम्ही देऊ. आमच्याकडे अनुभव आहे आणि तुमच्यासाठी काम सोपे होईल. यूपीसीएने सांगितले की, यूपी लीग एकना स्टेडियमवर होत असल्याने हा सामना ग्रीन पार्क कानपूर येथे आयोजित करण्यात यावा.
आतापर्यंत, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटीचे पहिले तीन दिवस कोणतीही खेळ न होता रद्द करावे लागले. त्याचबरोबर शेवटचे दोन दिवसही सामना होईलच याची शाश्वती नाही. पाचही दिवस जर खेळ झाला नाही तर अफगाणिस्तानची खूप निराशा होईल. कारण मोठ्या संघाविरुद्ध कसोटी खेळण्याची संधी काही प्रसंगीच मिळते, पण यावेळी पावसाने परिस्थिती बिघडवली. या सामन्यातील खेळ सतत रद्द केल्यामुळे बीसीसीआयचीही खिल्ली उडवली जात आहे आणि सोशल मीडियावर सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डावरही टीका होत आहे. आता चौथ्या आणि पाचव्या दिवशी खेळ होऊ शकतो की नाही हे पाहणे बाकी आहे.
हे ही वाचा -
टीम इंडियाने नाकारलेल्या खेळाडूचा इंग्लंडमध्ये कहर! अर्ध्या संघाची केली शिकार, पहा Video