(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Cup 2023 : दिल्लीत कोण वरचढ ठरणार? पाच खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष
World Cup 2023 : आज होणाऱ्या सामन्यात पाच खेळाडूंच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...
AFG vs IND, ODI World Cup 2023 : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) आज भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यामध्ये सामना होणार आहे. अफगाणिस्तानची गोलंदाजी भारतीय फंलदाजांना अडचणीत टाकू शकते. अफगाणकडे एकापेक्षा एक दर्जेदार फिरकी गोलंदाज आहे. त्याशिवाय अफगाणिस्तानचे बरेच खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात, त्यामुळे हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. आज दुपारी 2 वाजत्याला सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी दीड वाजता नाणेफेक होईल. आज होणाऱ्या सामन्यात पाच खेळाडूंच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...
भारतीय फलंदाज अन् अफगाण गोलंदाज -
धावांचा पाऊस पडणाऱ्या मैदानात भारतीय फलंदाज आणि अफगाण गोलंदाज असा सामना होणार आहे. अफगाणिस्तानकडे एकापेक्षा एक अव्वल दर्जाचा फिरकी मारा आहे. त्यामध्ये राशिद खान, नूर अहमद, मोहम्मद नबी आणि मूजीब या चार गोलंदाजांचा समावेश आहे. तर दुसरीकडे भारतीय संघामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसारखे दर्जेदार फलंदाज आहेत. त्यामुळे आजचा सामना रंगतदार होणार आहे. आजच्या सामन्यात कोणत्या पाच खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वाधिक नजरा असतील, पाहूयात.
1. राशिद खान :
राशिद खानच्या कामिगिरीवर अफगाणिस्तानचा विजय अथवा पराभव अवलंबून आहे. राशिद खानची प्रदर्शन अफगाणिस्तान संघाची कामगिरी ठरवणार आहे. राशिद खान भारतीय खेळपट्टीवर आतापर्यंत चांगला खेळला आहे. आयपीएलमध्ये त्याने आपल्या गोलंदाजीने भल्या भल्यांना चारीमुंड्या चीत केले आहे. आजच्या सामन्यात राशिद खानचा सामना भारतीय फलंदाज कसा करतात, हे पाहण औत्सक्याचे ठरणार आहे.
2. फजलहक फारूकी :
फजलहक फारुकी याने आफल्या वेगवान माऱ्याने सर्वांनाच प्रभावित केले आहे. 2022 पासून त्याने पावरप्लेमध्ये 19 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना बाद करण्याचे आव्हान फारुकीसमोर असणार आहे. फारुकीचा लेफ्ट आर्म अँगल भारतीय टॉप ऑर्डरसाठी आव्हानात्मक असणार आहे.
3. रहमानुल्लाह गुरबाज :
अफगानिस्तानला गुरबाज याच्याकडून फलंदाजीमध्ये मोठी अपेक्षा असेल. गुरबाजने गेल्या काही वर्षांमध्ये खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. अफगाणिस्तानकडून सर्वात वेगवान एक हजार धावा करणारा फलंदाज आहे. सलामीला वेगाने धावा काढण्यात गुरजाब तरबेज आहे. त्यामुळे गुरबाजची कामगिरी सामन्याचा निकाल ठरवू शकते.
4. रोहित शर्मा :
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरोधात भोपळाही फोडता आला नाही. पण दिल्लीमध्ये रोहित शर्मा चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच मैदानावर दक्षिण आफ्रिका संघाने आपल्या पहिल्या सामन्यात 400 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडला आहे. सलामी फलंदाज रोहित शर्मा वेगाने धावा काढू शकतो. दिल्लीची खेळपट्टी सपाट आहे, रोहित शर्माला या खेळपट्टीवर मोठी खेळी करण्याची संधी असेल.
5. विराट कोहली :
भारताच्या प्रत्येक सामन्यात किंग कोहलीच्या कामगिरीकडे नजरा असतात. त्यात दिल्ली कोहलीचे होम ग्राऊंड आहे. लहानपणापासून कोहली या मैदानावर खेळला आहे. त्यामुळे मैदानाची संपूर्ण माहिती कोहलीला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात कोहलीने 85 धावांची खेळी करत दमदार सुरुवात केली होती. आता आजही होणाऱ्या सामन्यात कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. विराट कोहली जितका संयमी फलंदाजी करतो, तितकाच आक्रमक फंलदाजीही करण्यातही माहीर आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या कामगिरीकडे आज सर्वांच्या नजरा असतील.