Prakash Padukone Corona Positive : माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांना कोरोनाची लागण, बंगळुरूतील रुग्णालयात दाखल
भारताला बॅडमिंटन विश्वात नवी ओळख देणारे जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना बंगळुरूच्या भगवान महावीर जैन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईः जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचे वडील प्रकाश पादुकोण यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रकाश यांना बंगळुरूच्या भगवान महावीर जैन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांकडून एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश पादुकोण यांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं आणि सध्या त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्यांची तब्येत पूर्णपणे बरी झाल्यास त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
प्रकाश पादुकोण यांच्यासोबतच दीपिका पादुकोणची आई उज्ज्वला आणि बहीण अनिशा पादुकोण यांनाही कोरोनाची काही लक्षणं आढळून आली होती, मात्र आता या दोघींची प्रकृती ठीक असून त्या घरीच आयसोलेटेड आहेत.
प्रकाश पादुकोण यांनी अलीकडेच कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता आणि लवकरच ते दुसरा डोस घेण्याच्या तयारीत होते. मात्र दुसरा डोस घेण्यापूर्वीच त्यांना कोरोना झाल्याचं निदर्शनास आलं आणि त्यांना योग्य उपचार मिळावेत याकरिता रुग्णालयात दाखल केलं गेलं.
बॅडमिंटन विश्वात भारताला नाव कमावून देणाऱ्या प्रकाश पादुकोण यांचं वय सध्या 65 वर्ष इतकं आहे. प्रकाश यांनी 1980 साली बॅडमिंटन विश्वात पहिला रॅंक मिळाला होता, ते जगातील सर्वोत्कृष्ट बॅडमिंटनपटू ठरले होते. त्याच वर्षी जगातील सर्वात मोठी मानली जाणारी ऑल इंग्लंड ओपन ही टूर्नामेंटही त्यांनी जिंकली. ऑल इंग्लंड ओपन ही स्पर्धा जिंकणारे ते पहिलेच भारतीय होते. इतकंच नाही तर 1978 मध्ये कॅनडा येथे झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेतही त्यांनी सिंगल्स कॅटेगरीत सूवर्णपदक पटकावलं. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये प्रकाश पादुकोण यांच्या कामगिरीची यादी बरीच लांब आहे.
प्रकाश पादुकोण यांना 1972 साली प्रतिष्ठित क्रीडा पुरस्कार अर्जुन अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर पादुकोण यांना देशाला बॅडमिंटन विश्वास उंच शिखरावर नेण्यासाठी 1982 साली पद्मश्री पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं.
कोरोना व्हायरस हा केवळ रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या किंवा शरीराने नाजूक असणाऱ्यांनाच होतो असं नाही, प्रकाश पादुकोण 65 वर्षाचे असून सुद्धा ते अजूनही आरोग्याची योग्य काळजी घेतात, तरीदेखील त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे सरकारने घालून दिलेल्या नियमांचं पालन करून बाहेर न पडता घरीच राहावं. जितकं शक्य आहे तितकी सर्वांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी, जेणेकरून भारतावर ओढावलेलं हे संकट लवकरच दूर होण्यास मदत होईल!
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )