(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CWG 2022, Medal Tally : भारताची दिवसभरात तीन पदकांवर झडप, एकूण पदकसंख्या नऊ, कसा होता स्पर्धेतील चौथा दिवस?
Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत भारताने चौथ्या दिवशी देखील दमदार कामगिरीच्या जोरावर तीन पदकं खिशात घालत पदकसंख्या एकूण नऊवर पोहचवली आहे.
India in Commonwealth Games 2022 : इंग्लंडच्या बर्मिगहम येथे कॉमनवेल्थ 2022 स्पर्धा (Commonwealth Weightlifting Games 2022) पार पडत आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असून दरदिवशी भारत पदक खिशात घालत आहे. भारताचे वेटलिफ्टर दमदार कामगिरी करताना दिसत असून स्पर्धेच्या चौथ्यादिवशी देखील भारताने 3 पदकं खिशात घातली आहेत. यामध्ये ज्युदो खेळात दोन तर वेटलिफ्टिंगमध्ये एक पदक भारताने मिळवलं. यामुळे भारताची पदकसंख्या नऊवर गेली आहे.
ज्युदोमध्ये डबल धमाका
चौथ्या दिवशी भारताने सर्वाधिक दोन पदकं ज्युदो खेळात मिळवली. यावेळी सुशीला देवीने महिलांच्या 48 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं. तिला दक्षिण अफ्रिकेच्या मायकेला व्हाइटबूईने मात दिली. तर विजय कुमार (Vijay Kumar) याने 60 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवलं आहे. विजयला सायप्रसच्या पेट्रोस क्रिस्टोडौलाइड्सने मात दिल्यामुळे कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.
वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य
स्पर्धेत भारतानं सर्वाधिक पदकं वेटलिफ्टिंगमध्ये जिंकली आहेत. भारतीय वेटलिफ्टर्सचा सर्वच वजनी गटात दबदबा पाहायला मिळत आहे. भारतानं याच खेळात आणखी एक पदक मिळवलं आहे. भारताची वेटलिफ्टर हरजिंदर कौरने (Harjinder Kaur) कांस्य पदक खिशात घातलं आहे. वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या 71 किलो वजनी गटात हरजिंदरनं ही कामगिरी केली. हरजिंदर कौरनं स्नॅचमध्ये 93 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 119 किलो असं एकूण 212 किलो वजन उचलून कांस्य पदक जिंकलं.
आणखी तीन पदकं निश्चित
याशिवाय लॉन बाऊल्समध्येही भारतीय महिलांचा ग्रुपने फायनलमध्ये पोहोचल्याने किमान रौप्यपदक भारताने निश्चित केलं आहे. तर बॅडमिंटन आणि टेबल टेनिस संघानेही फायनलमध्ये ध़डक घेत किमान रौप्यपदक निश्चित केलं आहे. या पदकांसह भारताच्या खात्यावर 12 पदकं झाली असून ही तीन पदकं सुवर्ण असतील की रौप्य हे पाहावं लागेल.
हे देखील वाचा-