(Source: ECI/ABP News/ABP Majha)
National Games 2022 : परळीच्या मराठमोळ्या श्रद्धा गायकवाडची सुवर्णपदकाला गवसणी, ऑलम्पिक स्पर्धेसाठीही झाली निवड
National Games : गुजरातमध्ये सुरु नॅशनल गेम्स स्पर्धेत बीडच्या परळी येथील श्रद्धा गायकवाड हीने स्केट बोर्डिंग खेळात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळवलं आहे.
Shraddha Gaikwad Won Gold Medal : गुजरातमध्ये पार पडणाऱ्या 36 व्या नॅशनल गेम्स (National Games 2022) अर्थात राष्ट्रीय खेळ स्पर्धा 2022 मध्ये बीडच्या परळी येथील श्रद्धा गायकवाडने सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. स्केट बोर्डिंग क्रिकेट प्रकारात तिने केलेल्या या कामगिरीमुळे फ्रान्समध्ये होणाऱ्या आगामी ऑलिम्पिकसाठी भारतीय संघातही तिची निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून परळीसह अवघ्या महाराष्ट्रसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे.
श्रद्धा गायकवाड ही ऑलम्पिकसाठी निवड होणारी परळीतील पहिलीच खेळाडू ठरली आहे. त्यामुळे परळीसाठी ही अत्यंत गौरवाची बाब ठरली आहे. अहमदाबाद येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीच्या श्रध्दा रविंद्र गायकवाडने स्केट बोर्डिंग या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. श्रद्धाचे वडिल रविंद्र गायकवाड हे परळी येथील रहिवाशी असून ते सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात, अशामध्ये श्रद्धाने मिळवलेलं हे यश गायकवाड कुटुंबियांसह परळीसाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे.
बिकट परिस्थितीवर मात करत श्रद्धाचं यश
श्रद्धा गायकवाड या परळीच्या सुवर्णकन्येने परळीचे नाव संपूर्ण भारत देशात गाजवले आहे. परळीचे रविंद्र गायकवाड यांची ती कन्या असून रविंद्र गायकवाड हे पुण्यामध्ये एका खाजगी कंपनी मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यामुळे अतिशय बिकट परिस्थितीमधून श्रद्धाने ही सुवर्ण कामगिरी केली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
धनंजय मुंडेसह प्रितम मुंडेंनी केलं खास अभिनंदन
''आपल्या जिल्ह्याची लेक प्रथमच ऑलम्पिकमध्ये सहभागी होते आहे, बीड आणि परळीकरांसाठी ही बाब अभिमानास्पद आणि गौरव वाढवणारी आहे. श्रद्धाचे खूप खूप अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा.'' अशा शब्दात खासदार प्रितम मुंडेंनी श्रद्धाचं अभिनंदन केलं आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार धनजंय मुंडे यांनी ''अभिमानास्पद! आमच्या परळीतील गायकवाड कुटुंबाची कन्या कु.श्रद्धाने अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्केटबोर्डिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत भारतीय ऑलिम्पिक स्थान निश्चित केले आहे.'' अशा शब्दात श्रद्धाचं कौतुक केलं आहे.
अभिमानास्पद! आमच्या परळीतील गायकवाड कुटुंबाची कन्या कु.श्रद्धाने अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्केटबोर्डिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत भारतीय ऑलिम्पिक स्थान निश्चित केले आहे. pic.twitter.com/rWxtWfmUZI
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 6, 2022
हे देखील वाचां-