IND vs AUS : भारताचा संपूर्ण डाव एका ट्विटमध्ये! 'त्या' ट्विट वर प्रतिक्रियांचा पाऊस
ऑस्ट्रेलिया विरोधात पहिल्या कसोटी सामन्यात भारताला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे.भारताचा संपूर्ण डाव एका ट्विटमध्ये सामावला आहे.
IND vs AUS, Adelaide Test Result : ऑस्ट्रेलिया विरोधात पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा लाजीरवाणा पराभव झाला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच आठ गडी राखून ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. सामन्याच्या चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 90 धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाने केवळ दोन विकेट्स गमावत 21 ओव्हर्समध्येच भारताने दिलेलं लक्ष्य गाठत विजय आपल्या नावे केला आहे. भारताच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. अशातचं ईएसपीएन क्रिकेट इन्फो (espncricinfo) या वेबसाईटने एक ट्विट करत भारताची संपूर्ण इनिंग एका ट्विटमध्ये दिली आहे.
ट्विटर वर 280 अक्षरांची (characters) मर्यादा असते. मात्र, भारताचा संपूर्ण डाव फक्त 128 कॅरक्टर्समध्ये आटोपला आहे. केवळ 128 चेंडूमध्ये भारताचे सर्व रथी-महारथी खेळाडून तंबूत परतले आहे. तेही कसोटी सारख्या फॉर्मटमध्ये. भारताने पहिल्या डावात 244 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी धमाकेदार खेळी करत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 191 धावांवर रोखलं. भारतीय संघ दुसऱ्या डावात 53 धावांच्या आघाडीसह मैदानावर उतरला होता. मात्र, टीम इंडियाच्या फलंदाजांनी अत्यंत लाजिरवाणी खेळी केली आणि दुसऱ्या डावात केवळ 36 धावा केल्या.
That innings: 1 0 0 0 0 0 0 3 0 2 0 1 0 0 0 0 0 0 W 0 0 0 0 0 0 0 0 0 0 2 0 0 0 0 0 0 0 0 0 4 0 0 2 0 0 0 0 W 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 W 0 0 0 0 W 0 0 0 W 0 0 0 4 W 0 0 0 0 0 0 0 0 0 0 2 0 0 0 0 0 1 0 0 2 0 0 2 0 0 0 0 0 0 W W 0 0 4 0 0 1 0 W 0 1 0 4 0 0 0 #AUSvIND
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 19, 2020
दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी अतिशय निराशा केली. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीच्या मनगटाला दुखापत झाली आणि तो रिटायर्ट हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. परिणामी भारताचा डाव अवघ्या 36 धावात संपुष्टात आला.
भारतीय संघाच्या कोणत्याही फलंदाजाला धावसंख्येचा दुहेरी आकडा गाठता आला नाही. मयांक अग्रवालने सर्वाधिक 9 धावा केल्या. तर हनुमा विहारीला 8 धावा करण्यात यश आलं. चेतेश्वर पुजारा, अजिंक रहाणे आणि आर अश्विनला भोपळाही फोडता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून जोस हेजलवूडने अवघ्या 8 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या तर पॅट कमिन्सला 21 धावा देऊन चार विकेट्स मिळवता आल्या.
ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेमध्ये टीम इंडियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण विराट कोहली पहिल्या सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. तसेच टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्माचीही दुसऱ्या कसोटी सामन्यात वापसी होण्याची शक्यता कमी आहे. याव्यतिरिक्त मोहम्मद शमीला दुखापत झाल्यामुळे संघाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात पुढील तीन कसोटी सामने खेळणाऱ्या टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियाचं आव्हान थोपवणं कठिण असणार आहे.
संबंधित बातमी : IND vs AUS, Adelaide Test Result | ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा 8 विकेट्सनी पराभव