Asia Cup : विराट कोहली गोल्डन डकचा शिकार, आशिया चषकात पहिल्यांदाच शून्यावर बाद
Asia Cup : आशिया चषकातील करो या मरो लढतीत टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली.

Virat Kohli in Asia Cup : आशिया चषकातील करो या मरो लढतीत टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. मात्र, केएल राहुल पुन्हा एकदा अपयशी ठरला. राहुलपाठोपाठ फॉर्मात असलेला विराट कोहलीही बाद झाला. विशेष म्हणजे, विराट कोहलीला एकही धाव काढता आली नाही. आशिया चषकाच्या इतिहासात विराट कोहली पहिल्यांदाच शून्यावर बाद झालाय.
विराट कोहलीनं तीन सामन्यात 155 धावांचा पाऊस पाडला होता. पाकिस्तानविरोधात नुकत्याच झालेल्या सामन्यात विराट कोहलीनं दमदार अर्धशतक झळकावलं होतं. तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या विराट कोहलीला दिलशान मदुशंकानं त्रिफाळाचित बाद करत श्रीलंकेला मोठं यश मिळवून दिलं. विराट कोहली बाद झाला तेव्हा भारतीय संघानं दोन गड्यांच्या मोबदल्यात फक्त 13 धावा केल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव सध्या मैदानावर आहेत.
Virat Kohli registered his first ever duck in Asia Cup history.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 6, 2022
राहुलचा पुन्हा फ्लॉप शो -
दुखापतीनंतर भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या राहुलला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. राहुलला आतापर्यंत एकाही सामन्यात अर्धशतकी खेळी करता आली नाही. राहुलचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
आशिया चषकात विराट कोहलीची कामगिरी -
विराट कोहलीनं एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या आशिया चषकातच उभारली आहे. विराट कोहलीनं एकदिवसीय आशिया चषकात 183 धावांची खेळी केली होती. एकदिवसीय आशिया चषकामध्ये विराट कोहलीने 11 सामन्यातील 10 डावात 613 धावांचा पाऊस पाडलाय. यामध्ये तीन शतकांचा समावेश आहे. तर टी 20 आशिया चषकामध्ये विराट कोहलीनं 9 सामन्यातील 8 डावात 307 धावांचा पाऊस पाडलाय. यामध्ये तीन अर्धशथकांचा समावेश आहे.
भारताने नाणेफेक गमावली -
मोक्याच्या सामन्यात रोहित शर्मानं नाणेफेकीचा कौल गमावला आहे. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शानाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. करो या मरोच्या सामन्यात भारतीय संघामध्ये एक बदल करण्यात आला आहे. रवी बिश्नोईला वगळण्यात आले आहे. रवी बिश्नोईच्या जागी आर अश्विनला संधात स्थान देण्यात आले आहे. श्रीलंकेच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवण्यात आला आहे.
भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक हुडा, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह.
श्रीलंकेचा संघ:
पाथुम निसानका, कुसल मेंडिस, चरित असलंका, दनुष्का गुणातिलका, दासुन शनाका, भानुका राजपाक्षे, वानिंदु हसनंगा, चमिका करुणारत्ने, महिष थिक्षण, असिता फर्नान्डो, दिलशान मदुशंका
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
