(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Asia Cup 2022 : टीम इंडियाकडे शेवटची संधी, आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान लढत
IND vs AFG : आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात सुपर 4 फेरीतील सामना रंगणार आहे. आज टीम इंडियाकडे फायनलमध्ये पोहोचण्याची शेवटची संधी आहे.
India vs Afghanistan : आशिया चषकाच्या (Asia Cup 2022) श्रीलंकेनं भारताचा पराभव केल्यानंतर या स्पर्धेतील भारतासाठी फायनलपर्यंत पोहोचण्याची मार्ग अवघड आहे. भारताला आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आज शेवटची संधी आहे. भारताला आजचा अफगाणिस्तान विरुद्धचा सामना मोठ्या फरकानं जिंकावा लागणार आहे. आशिया चषकातील सुपर 4 लढतीमध्ये भारताचा दोन वेळा पराभव आहे. अशा स्थितीत देखील भारताला अंतिम सामन्यात पोहोचण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी टीम इंडियाला आज तुफान खेळी करावी लागणार आहे.
काय आहेत समीकरणं
भारत आणि श्रीलंका यांच्यात बुधवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं भारताचा पराभव केला. हा निकाल अनेकांना अनपेक्षित होता. स्पर्धेच्या सुरुवातीला अडखळणाऱ्या श्रीलंकने दमदार पुनरागमन केलं आहे. बांगलादेशविरुद्ध अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवत सुपर फोरमध्ये आलेला श्रीलंकेचा संघ अंतिम सामन्यात पोहोचलेला पहिला संघ ठरला आहे. एकीकडे श्रीलंकेने अंतिम फेरीत मजल मारली असली तरी दुसरीकडे सलग दुसऱ्या पराभवामुळे भारताची वाट अवघड झाली आहे. पुढील प्रवासासाठी भारताला इतर संघांवर अवलंबून रहावं लागणार आहे. आज भारताने अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत करणे गरजेचे आहे. त्याचबरोब श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत करणे देखील गरजेचं आहे. सुपर फोरमधील सर्व सामने संपल्यानंतर भारताचं नेट रनरेट हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानपेक्षा अधिक असायला हवा. तरच भारताला अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळेल.
....तर भारत श्रीलंका यांच्यात अंतिम सामना होईल
अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभूत केल्याने भारताला अफगाणिस्तानविरुद्धचा आजचा सामना मोठ्या फरकाने जिंकून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी श्रीलंकेवर अवलंबून रहावं लागणार आहे. श्रीलंकेने आपली विजयी घौडदौड सुरु ठेवत पाकिस्तानला पराभूत केलं तर अंतिम सामन्यात श्रीलंकेचा संघ पुन्हा एकदा भारताविरुद्ध मैदानात उतरेल.
भारताला अंतिम फेरी गाठायची असेल, तर सर्वात आधी आजच्या सामन्यात अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर विजय आवश्यक असेल. यानंतर भारतीय संघाला पुढील सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत करावं लागेल. शेवटी भारताला पाकिस्तान आणि श्रीलंकेतील सामन्यात श्रीलंकेच्या विजयाची प्रार्थना करावी लागणार आहे. सुपर-4 मध्ये, श्रीलंका त्यांचे दोन्ही सामने जिंकून सुपर-4 टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. अंतिम फेरी गाठण्याच्या अगदी जवळ आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा संघ भारताला हरवून दुसऱ्या स्थानावर आहे. तर सुपर-4 मध्ये भारताने आपले दोन्ही सामने गमावले आहेत. आणि अफगाण संघ श्रीलंकेकडूनही सामना हरला आहे. अशा परिस्थितीत, आज अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानचा पराभव करणे भारतासाठी गरजेचं आहे.