(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs HK, Asia Cup 2022: भारताची सुपर-4 मध्ये धडक, हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव
IND vs HK, Asia Cup 2022: या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं 20 षटकात दोन विकेट्स गमावून हाँगकाँगसमोर 193 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.
IND vs HK, Asia Cup 2022: तडाखेबाज फलंदाजी आणि त्यानंतर भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं हाँगकाँगला 40 धावांनी पराभूत केलंय. या विजयासह भारतानं आशिया चषकाच्या सुपर-4 मध्ये धडक दिलीय. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं 20 षटकात दोन विकेट्स गमावून हाँगकाँगसमोर 193 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात हाँगकाँगच्या संघाला 20 षटकात 152 धावापर्यंत मजल मारता आली.
ट्वीट-
भारताची सुपर-4 मध्ये धडक
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं आशिया चषक 2022 मध्ये 'अ' गटातील दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव केला. या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतानं हाँगकाँगसमोर 193 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात हाँगकाँगनं शेवटपर्यंत झुंज सुरू ठेवली. पण निर्धारित 20 षटकांत 5 विकेट गमावून 152 धावाच करू शकला. हाँगकाँगकडून बाबर हयातनं सर्वाधिक 41 धावांची खेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा आणि आवेश खान यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
सूर्यकुमार यादव, विराट कोहलीची दमदार फलंदाजी
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं पॉवरप्लेमध्ये एक विकेट्स गमावून 44 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 13 चेंडूत 21 धावा करून झेलबाद झाला. केएल राहुलनंही (KL Rahul) अतिशय संथ खेळी केली. तो 39 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीनं भारतीय संघाचा डाव सावरला. या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 98 धावांची भागीदारी झाली. सूर्यकुमार यादवनं अवघ्या 26 चेंडूत 68 धावांची दमदार खेळी केली. ज्यात सहा षटकार आणि सहा चौकारांचा समावेश आहे. दरम्यान, विराट कोहलीनंही अर्धशतक झळकावलं. त्यानं 44 चेंडूत नाबाद 59 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्यानं तीन चौकार आणि एक षटकार लगावलाय. हाँगकाँगकडून मोहम्मद जहाफर आणि आयुष शुक्लाला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली आहे.
हे देखील वाचा-