Yavatmal Rain Update : यवतमाळमध्ये अतिवृष्टी आणि पूर; 280 नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर
Yavatmal Rain Update : मुसळधार पावसामुळे यवतमाळमध्ये काही पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने 280 नागरिकांची सुरक्षित स्थळी सुटका केली आहे.
Yavatmal News : मागील तीन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात (Yavatmal District) संततधार पाऊस (Yavatmal Rain) सुरु आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पूरपरिस्थिती (Yavatmal Flood) निर्माण झाली होती. या पूरपरिस्थितीत जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या एकूण 280 नागरिकांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले आहे. तर 5317 नागरिकांना तात्पुरत्या निवारागृहात (Shelter Home) हलवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर बचाव कार्य सुरू होते.
यवतमाळ जिल्ह्यात 200 मीमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सकाळपासूनच तालुका व जिल्हा बचाव पथके नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम करित होते. महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे अडकलेल्या 110 नागरिकांना हेलिकॅाप्टर व एसडीआरएफच्या मदतीने आनंदवाडी येथे सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. याच तालुक्यातील दहिसावळी येथील आठ आणि धनोडा येथील 55 नागरिकांना जिल्हा शोध आणि बचाव पथकाने सुरक्षितपणे बाहेर काढले.
आर्णी तालुक्यातील कवठा बाजार येथील 4, यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथील 35, बेचखेड व खैरगाव येथील प्रत्येकी दोन, वडगाव येथील 60 असे एकूण पुरात अडकलेल्या 280 नागरिकांचे बचाव पथकाने सुरक्षित स्थलांतरण केले. पूरपरिस्थितीमुळे घर पडून यवतमाळ तालुक्यातील वाघाडी येथील एक महिला आणि बाभूळगाव तालुक्यातील सावरगांव येथील एक व्यक्ती पुरात वाहुन गेल्याने मृत झाल्याची घटना घडली आहे.
पूरपरिस्थितीमुळे काही लोकांचे तात्पुरत्या निवारागृहात स्थलांतरण करण्यात आले आहे. त्यात यवतमाळ तालुक्यातील 3 हजार 500 नागरिक, बाभुळगाव तालुका 400, आर्णी 140, राळेगाव 7, घाटंजी 500, दिग्रस 400, दारव्हा 250, नेर 100 आणि कळंब तालुक्यातील 20 नागरिक असे एकूण 5 हजार 317 नागरिकांची निवारगृहात व्यवस्था करण्यात आली. याठिकाणी भोजणासह अन्य आवश्यक व्यवस्था प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. निवारागृहासाठी नोडल अधिकारी नेमण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या यंत्रणेला सतर्क पाहण्याच्या सूचना
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सायंकाळी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आँनलाईन बैठक घेतली. यावेळी त्यांनी परिस्थितीचा तालुकानिहाय आढावा घेतला. नुकसानग्रस्त कुटुंबांना सानुग्रह अनुदान व धान्य वाटप करण्याचे निर्देश दिले. सततधार सुरु राहिल्यास पुन्हा परिस्थिती बिघडण्याची शक्यता असल्याने सर्वांनी सतर्क राहावे, अशा सूचना केल्या. पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या संभाव्य ठिकाणावरुन नागरिकांना हलविण्याची कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.